State Rain – मुंबईसह राज्यात मान्सून दाखल होण्यास अजून पंधरा ते वीस दिवसांचा अवधी असताना, अवकाळी पावसाने मुंबईसह राज्यातील विविध भागात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, आगामी काळात ही पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाने आवाहन केले आहे.
मुसळधार पावसाचा इशारा…
दरम्यान, गेल्या आठवड्यात मुंबईसह राज्यातील विविध भागात हवामान खात्याकडून येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. यानंतर आता पुढील पाच दिवस ही अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचं हवामान खात्याने म्हटले आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाटसह गारपीठ देखील होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटले आहे.

अवकाळीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान
दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेली पिकं पावसाने हिरावून घेतली आहेत. त्यामुळे बळीराजावर अस्मानी आणि सुलतानी संकट ओढवले आहे. या अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये कांदा, द्राक्ष तर जळगावमध्ये केळींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. दुसऱ्याकडे विदर्भ आणि मराठवाड्यात तुरीचे नुकसान झाले. कोकणात काजू, आंबा या पिकांचे नुकसान झालेय तर पश्चिम महाराष्ट्रात काजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाने आवाहन केले आहे.