मुंबई – सध्या उन्हाळा सुरु आहे. वातावरणातील तापमानाचा पारा कमालीचा वाढल्यामुळे सर्वत्र गर्मी, उकाडा आणि अंगाची लाही-लाही होत आहे. या उकाड्याच पाण्याचा तुटवडा सुद्धा जाणवत आहे. परंतु या उन्हाळ्यात महाराष्ट्रातील चंद्रपूर शहर हे जगातील सर्वाधिक तापमानाचे शहर किंवा सर्वाधिक उष्ण तापमानाचे शहर ठरले असताना, आता पुढील तीन दिवसांसाठी नागपूरसह संपूर्ण विदर्भाला ‘हिट-वे’ चा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तीन दिवस हिट-वे चा इशारा…
दरम्यान, आजपासून पुढील तीन दिवसांसाठी नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट (Heat Wave) चा इशारा देण्यात आला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान खात्याकडून हिट-वे चा इशारा देण्यात आलेला आहे. उत्तर आणि पश्चिम दिशेने उष्ण वारे वाहत असल्याने विदर्भात उष्णतेची लाट आली असल्याचे हवामान खात्याच्या तज्ञांनी म्हटलं आहे. सोमवारी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, हे तापमान सामान्यपेक्षा ३ ते ५ अंश सेल्सिअसने अधिक आहे. तसेच वातावरण शुष्क (ड्राय) असल्यानेचं उन्हाचा तडाखा अधिक जाणवतोय.

दुपारी घराबाहेर पडू नका…
दुसरीकडे आजपासून पुढील ३ दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात हिट- वेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी प्रामुख्याने चंद्रपूर,अमरावती,नागपूर आणि अकोल्यात तापमानाचा पारा आणखीचं वाढण्याची शक्यता आहे. तर बुधवारी यामध्ये वर्धा जिल्हाची भर पडणार आहे. ही परिस्थिती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार आहे. ज्याप्रमाणे दिवसा सामान्यपेक्षा नोंदवण्यात येत आहे, त्याचं प्रमाणे रात्रीच्या तापमानात ही वाढ झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूरकर नागरिकांनी महत्वाचे काम असले तर घराबाहेर जा… अन्यथा दुपारी १२ ते ४ वाजताच्या दरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.