Pratap Sarnaik : रस्तेबाबत एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. रस्ता रक्षा निधीतून प्राधान्याने घेण्यात येणाऱ्या कामांसह निधी वापराबाबत नियमावली तयार करावी. तसेच रस्त्यावरील होणारे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. रस्ता सुरक्षा निधीबाबत, ऑटो-रिक्षा व मिटर्स टॅक्सी भाडे नाकारणे तक्रारीबाबत उपाययोजना करणे, मोटार वाहन विभागातील ऑनलाईन बदली धोरण आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जाहिरात धोरणाबाबत बैठक झाली.
दरम्यान, रस्ता सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. जनजागृतीसाठी ब्रँड अँबेसिडरची नियुक्ती करावी. सर्व रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. याबरोबरच रस्त्यावर झेब्रा क्रॉस यासह आवश्यक मार्किंग चिन्हे करण्यात यावीत. असे निर्देश परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांनी दिले.

मीटर रिक्षांना इंडिकेटर लावण्याच्या सूचना…
मोटार वाहन विभागात राबविण्यात येणारे ऑनलाईन बदली धोरण सर्वसमावेशक असावे. राज्य शासनाच्या अन्य विभागात ऑनलाइन बदली धोरण कशा प्रकारे राबवले जाते याची माहिती घेण्यात यावी, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले. सर्व मीटर रिक्षांना इंडिकेटर लावण्याच्या सूचना परिवहन प्राधिकरणाला दिल्या जातील तसेच बाईक टॅक्सी मधून रोजगार निर्माण होणार असल्याने या योजनेमध्ये काही सुधारणांबाबत आवश्यक मार्ग काढला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महामंडळाचे उत्पन्न वाढीसाठी नियोजन करावे…
उत्पन्न वाढीसाठी कोल्ड स्टोरेज सारखा प्रकल्प राबविण्याचा महामंडळाने विचार करावा. तसेच प्रवाशांना ऊन, वारा पाऊस याचा त्रास होऊ नये म्हणून या पुढील काळात नवीन एस.टी निवारे बांधतांना ते बंदिस्त पद्धतीचे बांधावेत तसेच एस.टी निवारे पी.पी.पी. तत्वावर करण्याबाबतचाही अभ्यास करण्यात यावा. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे, यासाठी जाहिरात धोरणाचा मसुदा तयार करावा. जाहिरात व पार्सल सेवेतून एस. टी. महामंडळास अधिकचे उत्पन्न मिळाले पाहिजे याचे नियोजन करावे.