Prabhu Gaur Gopal Das : राज्य शासनाने टेक-वारी या कार्यक्रमाचे आयोजन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात केले आहे. सोमवारपासून उपक्रमाला सुरुवात झाली आहे. ५ त ९ मे पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. धावपळीच्या जीवनात संघर्षांवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रेरणादायी वक्ते व लेखक प्रभू गौर गोपाल दास यांनी व्यक्त केले. टेक-वारी कार्यक्रमात ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर प्रभू गौर गोपाल दास बोलत होते.
धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणसं जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. मोबाईल, सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा आहे. असा मंत्रही प्रभू गौर गोपाल दास यांनी दिला.

आयुष्यभर विद्यार्थी राहा
दरम्यान, पुढे बोलताना प्रभू गौर गोपाल दास म्हणाले की, वृद्धापकाळातही अल्झायमर आणि डिमेन्शियासारखे आजार टाळण्यासाठी मेंदूला वर्कआउट देणे गरजेचे आहे. डिजिटल युगात विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सद्वारे हे अधिक सुलभ झाले आहे. शिकण ही एक प्रक्रिया आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरू असते. वय कितीही असो, नवीन कौशल्य शिकणे, भाषा आत्मसात करणे किंवा एखादा छंद जोपासणे यामुळे मेंदू अधिक कार्यक्षम राहतो. तसेच आयुष्यभर शिकत राहिले पाहिजे, विद्यार्थी राहिले पाहिजे.
संस्कृती मानसिक आरोग्य सांभाळा
तंत्रज्ञानाच्या विकासात आपण पुढे जात असताना, आपल्या परंपरा, नीतिमूल्य विसरता कामा नये. स्मार्ट, डिजिटल व भविष्यकाळासाठी सज्ज होण महत्त्वाच आहे. संस्कृती आणि मूल्य ही आपल्या जीवनात महत्त्वाची आहेत. आपले संस्कार आणि मूल्य यांचा विसर पडू देऊ नका. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. ध्यान, वाचन, मनमोकळ्या गप्पा किंवा छंद जोपासा. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांचा दिनक्रम ठेवा. या गोष्टींचा अवलंब केल्यास तणाव आणि मानसिक विकारांवर मात केली जाऊ शकते. असे प्रभू गौर गोपाल दास म्हणाले.
व्यक्त व्हा… मोकळे व्हा…
विविध ऑनलाईन कोर्सेस, मोबाइल अॅप्स आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्म्समुळे तंत्रज्ञान शिकण आता पूर्वीपेक्षा अधिक सोप झाले आहे, असेही प्रभू गौर गोपाल दास यांनी सांगितले. मनात सतत रेंगाळणारे विचार जर व्यक्त झाले नाही तर ते मानसिक आजारांना आमंत्रण देऊ शकतात. यासाठी एक सोपा उपाय म्हणजे मनातील त्रासदायक विचार एखाद्या व्यक्तीसमोर मोकळेपणाने व्यक्त करणे किंवा ते लिहून मोकळ होणे. ही पद्धत मनावरचा भार हलका करते आणि मन:स्वास्थ्य टिकवते.
काळानुरुप टेक्नोसॅव्ही बदल केला पाहिजे
सध्या जग वेगाने डिजिटल दिशेने वाटचाल करत आहे. स्मार्टफोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड संगणक, आणि इंटरनेट यांसारखी तंत्रज्ञान आपला रोजचा भाग बनत आहेत. अशा काळात ‘टेक्नोसॅव्ही’ होण ही केवळ गरज नसून ती एक अनिवार्यता बनली आहे. मंत्रालयाच्या या मंदिरात तंत्रज्ञान हे दैवत असून डिजिटल टेक्नॉलॉजी ही अभंगासमान आहे, आधुनिक काळात तंत्रज्ञान आणि डिजिटल कौशल्य ही यशस्वी भविष्यासाठी आवश्यक ठरली आहेत. त्यामुळे आपण त्याचा स्वीकार भक्तिभावाने करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.