मुंबईकरांसाठी मोठी बातमी! अवघा मे महिना पाणी कपातीचं संकट ?

मुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचे संकट ओढावणार आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. बीएमसी देखील सतर्क झाली आहे.

मुंबई: मे महिना नुकताच सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत ऊन देखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मुंबई शहरावर सध्या पाणीकपातीचं संकट घोंघावत आहे. कारण, मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तीव्र उन्हाच्या झळा बसत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांमधील एकूण पाणीसाठा केवळ 23 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिकेचा पाणी कपातीचा अलर्ट

मुंबईतील धरणांची परिस्थितीही चिंताजनक बनली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीसाठा इतक्या खाली आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबई महापालिकेने अद्याप पाणीकपातीचा कोणताही विचार केला नसला तरी येत्या 15 मे पर्यंत मुंबईतील सात प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे जल अभियंता विभागाने सांगितले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पुणे शहरात देखील काही दिवसांपूर्वी पाणी कपात सुरू करण्यात आली होती.

धरणांमधील सध्याचा पाणीसाठा

अप्पर वैतरणा   43961  दशलक्ष लिटर

मोडक सागर    35777   दशलक्ष लिटर

तानसा             27750    दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा     50325    दशलक्ष लिटर

भातसा            163512    दशलक्ष लिटर

विहार              9533        दशलक्ष लिटर

तुळशी             2861        दशलक्ष लिटर

सरकारने 2,30,500 दशलक्ष लिटर राखीव साठा भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातून देण्यास मान्यता दर्शविली आहे. त्यामुळे तात्काळ पाणीकपातीचा धोका टळला असला तरी, पुढील काही दिवसांतील पावसाचे प्रमाण आणि पाण्याची मागणी यावर परिस्थिती अवलंबून असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढावणार की नाही, याबद्दल मुंबई महापालिका निर्णय घेणार आहे.

महाराष्ट्रातील पाणी संकट 6 मे 2025 रोजी गंभीर बनले आहे. राज्यातील जलसाठ्यात 21% घट झाल्याने, पुणे, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली आहे. विशेषतः मराठवाड्यातील 50% शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे केला जात आहे. उदाहरणार्थ, जालन्यातील तपोवन गावातील महिला आणि मुले रोज 2 ते 4 किलोमीटर चालत पिण्याचे पाणी शोधतात. या परिस्थितीला कमी पाऊस, जलसाठ्यांची घट आणि जलस्रोतांचे अतिवापर कारणीभूत आहेत. 


About Author

Rohit Shinde

Other Latest News