सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिचं मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तिची हत्या झाल्याचा व तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा तिची हत्या झाली हे कोणत्याही वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही. दिशाच्या मृत्यूप्रकरणात घातपात नसल्याचं प्रतिज्ञापत्र एसआयटीने जारी केलं असून याप्रकरणातील आरोप निराधार असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. शिवाय आदित्य ठाकरेंच्या संदर्भात एसआयटीने महत्वपूर्ण नोंद केली आहे. आदित्य ठाकरेंना क्लीन चीट देण्यात आली आहे.
आदित्य ठाकरेंची माफी मागा; राऊतांची मागणी
विशेष म्हणजे दिशा सालियन आदित्य ठाकरेंना क्लीन चीट मिळाली आहे. याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मंत्री, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…. या लोकांनी शिवसेनेची आणि आदित्य ठाकरेंची माफी मागितली पाहिजे. एका तरुण नेत्याला त्यांनी घेरलं, बदनाम केलं पण आम्ही मागे हटलो नाही. त्यामुळे आता तुमच्याकडे थोडीशी देखील नैतिकता असेल तर आदित्य ठाकरेंची माफी मागा,” अशी मागणी आता संजय राऊतांनी केली आहे.

दिशा सालियन प्रकरण नेमकं काय?
दिशा सालियन प्रकरण हे जून २०२० मध्ये घडलेले एक गूढ प्रकरण आहे. दिशा सालियन ही एक सेलिब्रिटी मॅनेजर होती, जिने अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत काम केले होते. ८ जून २०२० रोजी ती मुंबईतील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडली आणि तिचा मृत्यू झाला. अधिकृतरित्या हा प्रकार आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचाही मृत्यू झाला, ज्यामुळे दोघांच्या मृत्यूमधील संभाव्य संबंधाबाबत चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर आणि काही राजकीय वर्तुळांतून दिशाच्या मृत्यूबाबत अनेक शंका व्यक्त करण्यात आल्या.
तपास यंत्रणांनी प्राथमिक चौकशीत दिशा सालियनने आत्महत्या केल्याचे निष्कर्ष काढले, पण अजूनही काही लोक या प्रकरणात अधिक तपासाची मागणी करत असतात. हे प्रकरण अजूनही अनेकांच्या दृष्टीने अनुत्तरित प्रश्न निर्माण करणारे आहे. काही नेत्यांनी आदित्य ठाकरेंच्या या प्रकरणाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता आदित्य ठाकरेना क्लीन चीट देण्यात आली आहे.