नवी दिल्ली – अंतराळात 17 दिवस घालवल्यानंतर अंतराळवीर शुभांशू शुक्ला 14 जुलै म्हणजे सोमवारी पृथ्वीवर परतणार आहे. त्यापूर्वी रविवारी संध्याकाळी झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमात, शुभांशू यांनी 1984 साली अंतराळात गेलेल्या भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केलाय. भारत आजही सारे जहाँ से अच्छा है, असं वक्तव्य या कार्यक्रमात शुभांशू यांनी केलंय.
शुभांशू पुढे म्हणाले की, 25 जून रोजी जेव्हा फाल्कन यात्रा सुरु केली होती त्यावेळी हा प्रवास इतका विस्मरणीय होईल याची कल्पनाही केली नव्हती. माझ्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांमुळेच हा प्रवास इतका सुखकर होऊ शकला. या ठिकाणी उपस्थित राहणं ही आनंदाची बाब असल्याचंही ते म्हणाले.

अडीच आठवड्यात काय केलं?
अंतराळ केंद्रात गेल्या अडीच आठवड्यांत अनेक प्रयोग केले, शिक्षण घेतल्याचं शुभांभू यांनी सांगितलं. भारतातून नेलेली काही पिकं अंतराळात नेऊन त्यांच्यावर काय परिणान होतो, याचाही अभ्यास करण्यात आला. या सगळ्यानंतर जितकाही वेळ मिळाला त्या काळात स्पेस स्टेशनच्या खिडकीतून पृथ्वी पाहत होतो, असंही त्यांनी म्हटलंय.
सोमवारी शुभांशू पृथ्वीवर परतणार
शुभांशू यांच्या परतीच्या प्रवासाची गुरुवारी अमेरिकेतील अंतराळ एजन्सीनं सविस्तर माहिती दिलीय. एक्सियम 4 मोहिमेअंतर्गत शुभांशूसह चार सदस्य आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरमध्ये पोहचले होते.
25 जून रोजी कॅनडाच्या स्पेस सेंटरमधून ही मोहीम लाँच करण्यात आली होती. ड्रॅगन अंतरिक्ष यान 28 तासांच्या प्रवासानंतर 26 जून रोजी स्पेस सेंटरमध्ये दाखल झालं होतं. हे मिशन 14 दिवसांचं होतं, मात्र या अंतराळवीरांची परतणी चार दिवस उशिरानं होतेय.
अंतराळातून कोणतीही सीमा दिसत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी 28 जून रोजी शुभांशू यानं व्हिडीओ कॉलवर चर्चा केली होती. अंतराळात गेल्यावर पहिल्यांदा काय जाणवलं असा प्रश्न पंतप्रधानांनी त्यांना केला होता. त्यावर अंतराळातून कोणतीही सीमा दिसत नाही. सगळी पृथ्वी एकजूट दिसते असं उत्तर हिमांशू यांनी दिलं होतं. गाजराचा हलवा घेऊन अंतराळात गेल्याचं आणि तिथं सहकाऱ्यांसोबत तो खाल्ल्याचंही शुभांशूनं त्यांना सांगितलं. शुभांशू शर्मा याची ही अंतराळ यात्रा भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानण्यात येते. पुढच्या गगनयान यात्रेसाठी शुभांशूच्या या अंतराळ यात्रेच्या अनुभवाचा मोठा फायदा इस्रोला होणार आहे.