महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. यंदा निकाल 91.88 टक्के लागला असून, यंदा राज्यात मुलींनी बाजी मारली आहे.
राज्याचा निकाल 91.88 टक्के
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,17,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88 आहे.

खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 36,133 एवढी असून त्यापैकी 35,697 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 29,892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 83.73 आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांचं चांगलं यश
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 42,388 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 42,024 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 15,823 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 37.65 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,258 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 6,705 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.38 आहे.