कल्याण-अकोला एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या!

अल्पवयीन मुलीवर धावत्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण ते अकोला मार्गावर धावणाऱ्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पोलिसांकडून या प्रकरणाचा आणखी तपास सुरू आहे.

16 वर्षीय मुलीवर एक्स्प्रेसमध्ये अत्याचार

डोंबिवली परिसरात राहणारी 16 वर्षीय मुलीसोबत आरोपीने ओळख वाढवत गप्पा मारण्यास सुरुवात केली. हळूहळू गप्पा मारत मारत तिला विश्वासात घेण्यास सुरुवात केली. यानंतर एकेदिवशी आरोपीने तिला फूस लावून आपल्या गावी नेण्याचं ठरवलं. कल्याण रेल्वे स्थानकात तो तिला घेऊन आला. कल्याण रेल्वे स्थानकातून आरोपीने अकोल्याला जाणारी एक्सप्रेस पकडली.

आरोपीने या अल्पवयीन मुलीवर धावत्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार केले. अकोल्यात गेल्यावर आरोपी तिला आपल्या घरी घेऊन गेला. मात्र, त्याच्या कुटुंबियांनी त्याला घरात घेतले नाही. यानंतर आरोपी तिला पुन्हा अकोल्याहून कल्याणमध्ये घेऊन आला. कल्याण रेल्वे स्थानकात तिला सोडून तो निघून गेला. या घटनेमुळे भेदरलेल्या मुलीने कल्याण स्थानकात थांबण्याचा निर्णय घेतला. ती असहाय्य अवस्थेत दिसल्यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या!

कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला पकडण्याच्या हालचाली सुरू केल्या. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली आणि त्याचा शोध सुरू केला. कल्याण रेल्वे पोलिसंनी आरोपी गजानन चव्हाण याला अकोला जिल्ह्यातील शेखापूर येथून ताब्यात घेत अटक केली आहे. आरोपीला कल्याण येथे आणण्यात आले आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलींवर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. अन्यथा असे अपराध आणखी वाढू शकतात.

About Author

Rohit Shinde

Other Latest News