शिर्डीत सराफा व्यापाऱ्याला लुटलं, सोन्याचे दागिने आणि रोकडसह चालक फरार!

शिर्डीत हॉटेलमध्ये थांबलेल्या सोने व्यापाऱ्यांचे साडेतीन कोटींचे सोने व चार लाखांची रोकड घेऊन गाडी चालक फरार झाला. शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.

शिर्डीतील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या सराफा व्यापाऱ्याला त्याच्याच वाहन चालकाने चुना लावल्याच समोर आले आहे. साडेतीन कोटींच्या चोरी प्रकरणाची विजयसिंह खिशी यांनी शिर्डी पोलिसांत तक्रार दिली असुन पोलिसांनी संशयीत ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. परंतु, या चोरी प्रकरणाने सराफा व्यापाऱ्यांत खळबळ माजली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई येथील सोन्याचे व्यापारी विजयसिंह खिशी यांनी आपल्या होलसेल सोन्याच्या फर्ममधून जवळपास 4 किलो 873 ग्रॅम वजनाचे दागिने 7 मे रोजी शिर्डी व अहिल्यानगर जिल्ह्यात विक्रीसाठी आणले होते. विजयसिंह यांच्यासोबत दोन सहकारी होते. एक कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि दुसरा चालक सुरेश कुमार. हे तिघे शिर्डीतील हॉटेल साई सुनीतामध्ये रूम नंबर 201 मध्ये मुक्कामी थांबले होते. सोन्याचे व्यापारी विजयसिंह खिशी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध सोनार दुकानांमध्ये या दागिन्यांची विक्री करण्यासाठी जात आणि रात्री पुन्हा हॉटेल मध्ये परत येत मुक्काम करत असत.

13 मे रोजी रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास सोन्याचे व्यापारी खिशी आणि कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि दुसरा चालक सुरेश कुमार हे तिघे ही जेवण करून झोपले होते. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग बेड आणि टेबलच्या मध्ये ठेवून खोली आतून बंद केलेली होती. पुढील दिवशी म्हणजे 14 मे रोजी सकाळी 6 वाजता खिशी यांचा चुलत भाऊ शैलेंद्रसिंह हा त्यांच्याकडील पेमेंट घेण्यासाठी हॉटेल मध्ये आला. त्यावेळी खोलीचा दरवाजा उघडाच आढळून आला. तर तेथुन चालक सुरेश कुमार गायब झालेला दिसुन आला . त्याचे मोबाईल फोन आणि कपडे मात्र खोलीतच ठेवलेले होते. यानंतर खिशी यांनी तात्काळ आपल्या सोन्याच्या बॅगेची तपासणी केली. त्यामध्ये असलेले सुमारे 3.5 किलो वजनाचे सोन्याचे दागिने, ज्याची अंदाजे किंमत 3 कोटी 22 लाख रुपये आणि त्याचबरोबर 4 लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांकडून तपास सुरू

यानंतर खिशी आणि कामगार चंद्रप्रकाश प्रजापती यांनी चालक सुरेश कुमारचा शिर्डी व परिसरात शोध घेतला असता तो कोठेही सापडला नाही. खिशी यांनी या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘चालक सुरेश कुमार त्यांच्या सेवेत गेल्या चार महिन्यांपासून कार्यरत होता. त्यांनी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून व्यवसायिक व्यवहारात सामावून घेतले होते. मात्र त्याने या विश्वासाचा गैरफायदा घेत चोरी; केल्याचा आरोप खिशी यांनी केला आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस वेगाने तपास करत आहे. हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स, आणि इतर माहिती गोळा केली जात आहे. चालक सुरेश कुमारने ही चोरी एकट्याने केली की त्याच्या मागे आणखी कुणाचा हात आहे. याचा तपास शिर्डी पोलीस करत आहेत.


About Author

Rohit Shinde

Other Latest News