Virat Kohli News In Marathi : भारताचा सध्याचा सर्वोत्म फलंदाज विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यासह टी-२० क्रिकेटच्या काळात कसोटी क्रिकेटचा संकटमोचक ठरलेल्या कोहलीने त्याच्या आभाळाएवढ्या करिअरला ब्रेक लावला आहे. अशा रितीने या महान खेळाडूच्या कसोटी कारकिर्दीच्या सुवर्ण अध्यायावर आता पडदा पडला आहे. ३६ वर्षीय विराट कोहली याने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉर्मेटला अलविदा केला होता. म्हणजेच आता कोहली भारतीय संघासाठी फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसेल.
विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटचा प्रवास
विराट कोहलीने २००८ मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, पण कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू करण्यासाठी त्याला तब्बल तीन वर्षं वाट बघावी लागली. २०११ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला होता. तिथेच जमैकाच्या किंग्स्टन येथील सबीना पार्क स्टेडियमवर कोहलीने आपली पहिली कसोटी खेळली. त्या सामन्यात विराटने पहिल्या डावात केवळ ४ आणि दुसऱ्या डावात १५ धावा केल्या होत्या.

पहिले कसोटी अर्धशतक वानखेडेवर
कोहलीचे पहिले कसोटी अर्धशतक त्याच वर्षी वेस्ट इंडीजविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर झळकले. येथून त्याच्या कसोटी करिअरची खरी सुरुवात ठरली.
पहिल्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दम दाखवला
यानंतर २०१२ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौर्यात विराट कोहलीची सुरुवात काहीशी अडखळती झाली. पहिल्या दोन कसोटीत अपयश आल्यानंतर, तिसऱ्या कसोटीत त्याने महत्त्वपूर्ण ७५ धावांची खेळी साकारली.
पुढे एडिलेडमध्ये झालेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला, पण विराटने ११६ धावांची दमदार शतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर मात्र कोहलीने कधीच मागे वळून पाहिले नाही.
कसोटीत ७ द्विशतके करणारा फलंदाज
आजवर विराट कोहलीने भारतासाठी १२३ कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने ४६.८५ च्या सरासरीने आणि ३० शतकांच्या मदतीने ९२३० धावा फटकावल्या. सोबतच विराट भारताकडून सर्वाधिक द्विशतके करणारा फलंदाज आहे. त्याने कसोटीत भारतासाठी ७ द्विशतके ठोकली.
सचिन तेंडुलकर – ६ द्विशतके
वीरेंद्र सेहवाग – ६ द्विशतके
राहुल द्रविड़ – ५ द्विशतके
सुनील गावसकर – ४ द्विशतके
भारताला सर्वाधिक कसोटी विजय मिळवून देणारा कर्णधार
विराट कोहली फक्त महान फलंदाजच नव्हे, तर भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारदेखील आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ६० कसोटी सामने खेळले आणि त्यातील ४० कसोटी सामने जिंकले. हे कोणत्याही भारतीय कर्णधाराने मिळवलेल्या सर्वाधिक कसोटी विजयांचे रेकॉर्ड आहे. विराटच्या खालोखाल महेंद्र सिंह धोनी याचा (२७ कसोटी विजय) नंबर लागतो.
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा, विराट चौथ्या स्थानावर
भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासात विराट कोहली याचे नाव सर्वोच्च फलंदाजांमध्ये घेतले गणले जाईल. धावा आणि शतकांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहेत. धावा आणि शतकाच्या बाबतीत भारताचे केवळ तीन खेळाडू त्याच्या पुढे आहेत. यात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, आणि सुनील गावसकर यांचा समावेश आहे. या सर्वांनी १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तर शतकांच्या बाबतीत विराट कोहलीने कसोटीत ३० झळकावली आहेत. या यादीतही त्याच्यापुढे फक्त सचिन, द्रविड़ आणि गावसकर आहेत. विराटने आपल्या करिअरचा शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये खेळला.