शुभमन गिलसाठी कर्णधारपदाची सुरुवात चांगली झाली नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला. २५ वर्षीय शुभमन गिलने २० जून रोजी लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण केले. त्याने पहिल्या डावात १४७ धावाही केल्या. पण असे असूनही, भारताला 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला.
शुभमन गिलच्या नावावर लज्जास्पद विक्रम
भारताने चौथ्या डावात इंग्लंडसमोर ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. बेन डकेटच्या १४९ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने ८२ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. या पराभवासह, गिल दिलीप वेंगसरकर आणि विराट कोहली यांच्या नकोशा यादीत सामील झाला. शतक झळकावूनही पहिली कसोटी गमावणारा तो तिसरा भारतीय कर्णधार ठरला

वेंगसरकर आणि विराटच्या नावावर नकोसा विक्रम
नोव्हेंबर १९८७ मध्ये अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध दिलीप वेंगसरकर यांनी कसोटी कर्णधारपदाची सुरुवात केली. दुसऱ्या डावात त्यांनी १०२ धावा केल्या. पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले आणि भारताला ५ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. डिसेंबर २०१४ मध्ये अॅडलेड ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाची सुरुवात केली. त्याने दोन्ही डावांमध्ये शतके (११५ आणि १४१) केली. पण असे असूनही, भारताला ४८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.