जाह्नवी डांगेटी आहे तरी कोण? NASA चा स्पेस प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय ठरलीय, आता 2029 मध्ये रचणार इतिहास

आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातील 23 वर्षीय जाह्नवी डांगेटी यांची निवड अमेरिकेच्या टायटन स्पेस मिशनसाठी झाली आहे. या मिशनअंतर्गत त्या 2029 साली अंतराळात प्रवास करणार असून, त्या पृथ्वीची दोन वेळा परिक्रमा करतील आणि सुमारे 3 तास शून्य गुरुत्वाकर्षण (Zero Gravity) मध्ये राहतील.

ही उड्डाण 2029 मध्ये अमेरिकेतून सुरू होईल आणि ऑर्बिटल पोर्ट स्पेस स्टेशनपर्यंत जाईल. या मिशनदरम्यान अंतराळयात्रेतील सहभागी अंतराळवीरांना दोन वेळा सूर्योदय आणि दोन वेळा सूर्यास्त पाहायला मिळणार आहे.

जाह्नवी डांगेटी यांचे शिक्षण

जाह्नवी यांनी पंजाबमधील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण घेताना त्यांनी अनेक प्रोजेक्ट्समध्ये सहभाग घेतला. त्या याआधीही नासाच्या आंतरराष्ट्रीय वायू आणि अवकाश कार्यक्रमाचा भाग राहिल्या आहेत.

कित्येक पुरस्कारांनी सन्मान

जाह्नवी यांच्या कौशल्याची पावती म्हणून त्यांना नासाच्या स्पेस अ‍ॅप्स चॅलेंजमध्ये ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ मिळाला आहे, तसेच ISRO कडून ‘यंग अचीवर्स अवॉर्ड’ देखील प्राप्त झाला आहे.

2026 मध्ये अंतराळ प्रशिक्षण

या मिशनच्या तयारीचा एक भाग म्हणून, 2026 मध्ये त्या नासाचे माजी अंतराळवीर कर्नल विल्यम मॅकआर्थर यांच्या मार्गदर्शनाखाली अंतराळवीर प्रशिक्षण घेतील.

कुटुंब आणि प्रेरणा

जाह्नवी यांचे वडील पद्मश्री आणि आई श्रीनिवास हे दोघे कामानिमित्त कुवेतमध्ये राहतात. जाह्नवी म्हणतात की, “माझं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू पाहतं आहे.” मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा जाह्नवी 11 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी प्रथमच NASA या संस्थेचं नाव ऐकलं आणि तेव्हापासून त्यांची उत्सुकता स्पेस सायन्सकडे वळली.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News