मराठा आरक्षण आंदोलनाच्या घोषणेनंतर ओबीसींच्या गोटात हालचाली सुरू; मराठा-ओबीसींमध्ये पुन्हा संघर्ष?

मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करताच आता ओबीसींच्या गोटात पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी असा संघर्ष पुन्हा एकदा निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीलाओबीसी नेते आणि समाजाचा विरोध आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने राज्यभर संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. समीर भुजबळ यांनी अहिल्यानगरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा संघर्षाचे वातावरण उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

ओबीसींच्या गोटात हालचालींना वेग

मराठ्यांचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करावा, अशी जरांगे यांची प्रमुख मागणी आहे. तर दुसरीकडे मराठ्यांचा ओबीसींमध्ये समावेश करण्यास ओबीसींचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने राज्यभर संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष व माजी खासदार समीर भुजबळ यासाठी शनिवारी अहिल्यानगरला आले होते. त्यांनी येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यामुळे 29 ऑगस्टला मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन झाल्यास ओबीसी समाजातून प्रक्षोभ होण्याची चिन्हे आहेत.

जरांगेंचा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार

मराठा आरक्षणाच्या दृष्टीने ऑगस्ट महिना महत्वाचा असणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी आता आरपारची लढाईची घोषणा केली आहे. गेल्या महिन्यात अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक झाली. त्यात त्यांनी मुंबईमध्ये आंदोलनाची घोषणा केली. मराठा समाजाला कोणीही रोखू शकत नाही. आता विजयाचा गुलाल घेऊनच यायचे असे आवाहन त्यांनी समाजाला केले. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी या लढ्यावर भाष्य केले आहे.

29 ऑगस्ट रोजी मराठा वादळ मुंबईत येऊन धडकणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हाक दिली आहे. मुंबईत आरक्षणाचा हुंकार घुमणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईसह राज्यात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

29 ऑगस्टला मुंबईत मराठा मोर्चा

27 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटी येथून मराठा समाजाचा मोर्चा निघेल. तो 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकेल. अंतरवाली सराटी येथून शहागड, पैठण, शेवगाव, पांढरीपूल, अहिल्यानगर, नेप्टी नाका मार्गे, आळेफाटा, शिवनेरी दर्शन, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर आणि पुढे मंत्रालयावर हा मोर्चा धडकणार आहे. मोर्चासाठी पैठण, गंगापूर, वैजापूर, येवला, नाशिक आणि पुढे मुंबई असा पर्यायी मार्ग ही असेल. त्यामुळे मुंबईतील मराठा समाजाचे आंदोलन लक्षवेधी ठरणार आहे. दुसरीकडे ओबीसी समाजातून काय प्रतिक्रिया येते, अथवा विरोधासाठी कोणती पाऊले उचलली जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News