शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरचा वाद सर्वोच्च न्यायालयात 7 मे 2025 रोजी सुनावणीसाठी येणार आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या 17 फेब्रुवारी 2023 च्या निर्णयाविरोधात विशेष परवानगी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला ‘शिवसेना’ पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले होते, ज्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता, त्याबाबत आता पुन्हा सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात 7 मे रोजी सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 7 मे रोजी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. फेब्रुवारी 2023 मध्ये दाखल केलेली ही याचिका सप्टेंबर 2023 नंतर पहिल्यांदाच सुनावणीसाठी न्यायालयासमोर येत आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. दीड वर्षानंतर लागलेल्या या सुनावणीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरेंनी लावली ताकद, निर्णयाला स्थगिती?
ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता दोन वर्षानंतर मूळ निर्णयाला आव्हान दिल्यासारखी परिस्थिती आहे. या याचिकेत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला “पक्षाच्या मूळ संघटनेचा विचार न करता” दिला गेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. आता 7 मे रोजी कोर्ट याबाबत नेमकं काय म्हणतं, आपला निर्णय कायम ठेवत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून, 7 मे रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये न्यायालय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अंतिम निर्णय देईल. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे आणि दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.या काळात जो काही निर्णय येईल त्याचा परिणाम थेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका निवडणुकीवर होणार आहे, त्यामुळे दोन्ही शिंदे आणि ठाकरेंच्या दृष्टीने यावेळी येणारा निर्णय महत्वाचा असणार आहे.