लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू आहे. जवळपास सर्व पात्र महिलांना एप्रिलचे पैसे वितरीत झाल्याची माहिती समोर येत आहे. एप्रिल महिन्याचे पैसे मिळण्यासाठी महिलांना बराच काळ वाट पाहावी लागली होती. त्यानंतर वेळोवेळी अनेक अंदाज लावले जात होते. अक्षय्य तृतीयेची तारीख मागे पडल्यानंतर मे महिन्याच्या सुरूवातीला पैसे वितरीत करण्यात आले. त्यानंतर आता मे चे पैसे कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मे महिन्याचा हप्ता लागोपाठ?
आता एप्रिल महिन्याच्या हप्त्या पाठोपाठ लगेच मे महिन्याचे 1500 रूपये महिलांना मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. साधारण महिन्याच्या 15 ते 20 तारखेच्या दरम्यान हे पैसे मिळत असतात. त्यामुळे आता एप्रिलचे वितरण पूर्ण झाल्यावर 15 तारखेच्या आसपास मे महिन्याचे पैसे महिलांना मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सरकारसमोर आर्थिक जुळवाजुळवीचे संकट?
या योजनेसाठी पैसे देताना सरकारसमोर आर्थिक तरतुद करताना अनेक अडचणी येत आहेत. एप्रिलचा हप्ता देताना सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वित्त विभागाने आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध समुदायांसाठी असलेला निधी वळवला. त्यानंतर संबंधित विभागाचे मंत्री संजय शिरसाटांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती.
‘अर्थ विभागाकडून मनमानी सुरु आहे. माझ्या विभागाचा निधी वर्ग किंवा कमी करता येत नाही. याबद्दल काही नियम आहेत का नाही? माझे 1,500 कोटींची देणी बाकी आहेत. ते वाढत आहेत. माझे पत्र देणे काम आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा, हे त्यांनी पाहावे.’ अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली होती.
लाडकी बहिण योजनाही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची सामाजिक कल्याण योजना आहे, ज्याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे आहे. महाराष्ट्र शासनाने 2025 – 26 या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी ₹36,000 कोटींची तरतूद केली आहे, जी मागील वर्षीच्या ₹46000 कोटींच्या तुलनेत ₹10,000 कोटीने कमी आहे. या कपातीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.