तुळजापूर: महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी तुळजापुरची आई तुळजाभवानी. या ठिकाणी दररोज हजारो भाविक दर्शन घेत असतात. लवकर दर्शन मिळावे यासाठी लोक व्हीआयपी पासचा आधार घेतात. पण, गेल्या काही काळापासून या व्हीआयपींमध्ये बोगस पासधारकांचे प्रमाण वाढले होते. मंदिर परिसरात बोगस पास विकले जात असल्याचं समोर आलं होतं. यावर निर्बंध आणावेत असं सामान्य लोकांमधून मागणी केली जात होती. आता त्याबाबत मोठा आणि तडकाफडकी निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
बोगस व्हीआयपींना दर्शन बंदी
तुळजाभवानी मंदिरात आता बोगस व्हीआयपींना थेट दर्शन बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. व्हीआयपी पास वाटपावरून भक्तांनी आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने मंदीर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाकडुन यापूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रातील ख्यातमान व्यक्तींना पास देण्यात येत होते. मात्र यामध्ये काही राजकीय व्यक्तींच्या नातेवाईकांना देखील पास देण्यात येत असल्याची चर्चा होत्या. तसेच व्हिआएपी दर्शन पासमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याच्या तक्रार खा. ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी केली होती. त्यानंतर आता बोगस व्हीआयपींना दर्शन पास न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या नियमांचं पालन करावं लागणार
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, मंदिर प्रशासनाने व्हीआयपी पास वितरणासाठी आता नवीन नियमावली जारी केली आहे. नव्या आदेशाचं तंतोतंत पालन होण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. या नियमावलीनुसार, केवळ संबंधित व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय आणि अधिकृत व्यक्तींनाच व्हीआयपी पास दिले जातील. मंदिर प्रशासनाने व्हीआयपी पास वितरणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. राजकीय व्यक्तींच्या निकटवर्तीयांना आता तात्काळ दर्शन घेणं अवघडं होणार आहे.
मंदिर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य भाविकांना दर्शनासाठी अधिक सोयीस्कर वातावरण मिळण्याची अपेक्षा आहे. मंदिर प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी कडकपणे करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता दर्शन रांगेच्या नावाखाली होणार भ्रष्टाचार थांबणार असून सामान्यांना लवकर दर्शन मिळणार आहे.