पडघा- ऑपरेशन सिंदूरनंतर देशातील स्लीपर सेलविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी मोहीम तीव्र केली आहे. दहशतवाद्यांची केंद्रस्थानं असलेल्या महाराष्ट्रातील मराठवाडा, ठाणे याकडंही तपास यंत्रणांचं लक्ष होतं. याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील दहशतवाद्यांचं केंद्र समजल्या जाणाऱ्या पडघ्यात एटीएसनं मोठी कारवाई केलीय. मुंबई साखळी बॉम्बस्फोटात शिक्षा भोगलेला आणि एकेकाळी सिमी या प्रतिबंधित संघटनेचा सचिव असलेला साकिब नाचण या निमित्तानं पुन्हा एकदा रडारवर आला आहे.
साकिबच्या घरावर ATSचा छापा
भिवंडी तालुक्यातील पडघा हे गाव एटीएसनं केलेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं. साकिब नाचणच्या घरावर छापे मारण्यात आले. त्यात काही महत्त्वाचे तांत्रिक धागेदोरे एटीएसच्या हाती लागल्याचं सांगण्यात येतंय. सर्च ऑपरेशनमध्ये तलवार , सुरा आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय. दहशतवादाला वाढविण्यास जबाबदार गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या. देशात घातपात घडवण्याचा कट आखला जात असल्याची प्राथमिक माहिती तपासात हाती आलीय. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय.

कोण आहे साकिब नाचण?
- 2002-03 मध्ये मुंबईत झालेल्या तीन बॉम्बस्फोटांचा तो मास्टरमाइंड
- या स्फोटांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 125 जण जखमी झाले होते
- लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या मदतीने स्फोट घडवल्याप्रकरणी साकिब दोषी आढळला होता
- बॉम्बस्फोटा प्रकरणी साकिबला 10 वर्षांची शिक्षा झाली होती
- 1991 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात त्याला पहिल्यांदा अटक झाली
- सुरुवातीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती, नंतर सर्वोच्च न्यायालयाने ती 10 वर्षांपर्यंत कमी केली, तो 2001 मध्ये तुरुंगातून सुटला
- मुंबई बॉम्बस्फोटात शस्त्रे बाळगल्याबद्दल त्याला ‘पोटा’ या दहशतवादविरोधी कायद्यानुसार शिक्षा झाली, या प्रकरणात तो 2017 मध्ये सुटला
- तुरुंगातून सुटल्यानंतर तो पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त होतोय.
- NIAच्या माहितीनुसार, तो इसिसच्या महाराष्ट्र युनिटचा प्रमुख मानला जातो
- साकिबला बॉम्ब बनवण्यात कुशल मानलं जातं
- 2023 साली नाचणला इसिसशी संबंधांमुळे केलं आहे गजाआड
- साकिबच्या घरच्या छापेमारीतून आता काय नवी माहिती समोर येते, काय नवे खुलासे होतात, याकडे लक्ष लागलंय