वॉशिंग्टन डीसी– अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलन मस्क यांच्यातील वाद हा जगभरात चर्चेचा विषय झालाय. यातच या वादानंतर एलन मस्क यांनी सोशल मीडिया एक्सवर 5 जूनला एक पोल शेअर केला होता. अमेरिकेत एक नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत अमेरिकेतील जनतेच्या प्रतिक्रिया त्यांनी या पोलमध्ये मागवल्या होत्या. यात 80.4 टक्के जनतेनं वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या बाजूनं कौल दिला आहे.
पोल संपल्यानंतर एलन मस्क यांनी पोस्ट रिपोस्ट करत द अमेरिकन पार्टी असं लिहिलंय. मस्क हे वेगळा पक्ष काढण्याच्या भूमिकेत आहेत आणि त्या पक्षाचं नाव द अमेरिकन पार्टी असं असेल असे स्पष्ट संकेत यातून मिळतायेत. मात्र अद्याप मस्क यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

मस्क यांना राजकीय शरणागती देण्याची रशियाची तयारी
मस्क आणि ट्रम्प यांच्यातील वाद विकोपाला जात असताना रशियानं मस्क यांच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. रशियाच्या एका खासदारानं मस्क यांना आवश्यकता पडल्यास रशियात राजकीय शरणागती देण्यात येईल, असं वक्तव्य केलंय. रशियाचे खासदार दिमित्री नोविकोव यांनी हे संकेत दिलेत.
तर क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी या वक्तव्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केलाय. हा अमेरिकेतील अंतर्गत वाद आहे, यात रशिया हस्तक्षेप करणार नाही, असं रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी सांगितलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ही परिस्थिती हाताळतील असंही त्यांनी म्हटलंय.
ट्र्म्प आणि मस्क वाद
ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव बॅनन यांनी मस्क हे बेकायदेशीर प्रवासी असून त्यांना देशातून बाहेर पाठवून देण्याचं विधान केलं होतं. मस्क यांची स्पेस एक्स ही कंपनीही अमेरिकेच्या सरकारनं ताब्यात घेण्याची मागणी बॅनन यांनी केली आहे.
गुरुवारी रात्री ट्रम्प आणि मस्क यांच्यात जोरदार वाद झाला. या वादात मस्क यांनी ट्रम्प यांना पदावरुन काढून टाकण्याचं वक्तव्य केलं. मस्क यांच्या मदतीशिवाय ट्रम्प निवडणूक जिंकू शकले नसते, असंही मस्क म्हणाले. ट्रम्प यांच्या बिग ब्युटिफुल विधेयकाला मस्क यांनी विरोध करताना, त्यांना पदावरुन काढून टाकण्याचं वक्तव्य केलं. उप राष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांच्याकडे हा पदभार द्यावा असंही मस्क म्हणाले.
मस्क यांच्या या हल्ल्याला ट्रम्प यांनीही प्रत्युत्तर दिलंय. मस्क सत्तेत असताना या विधेयकावर काही बोलले नाहीत आणि आता पदावरुन बाहेर पडल्यानंतर त्यांनी विरोधी भूमिका घेतल्याचं ट्रम्प यांचं म्हणणंय. मस्क यांच्या कंपनीला सरकारी कंत्राटं आणि सबसिडी देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय.
दोस्ती ते दुश्मनी कसा झाला प्रवास?
ट्रम्प यांनी मेमध्ये जाहीर केलेल्या नव्या बिग ब्युटिफुल विधेयकावरुन या दोघांमध्ये वाद निर्माण झालाय. या विधेयकात इलेक्ट्रिक वाहनं आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला देण्यात येणाऱ्या सबसिडीत कपात करण्यात आलीय. तर तेल आणि गॅस क्षेत्राला या विधेयकाचा फायदा होणार आहे.
सुरुवातील मस्क यांनी याबाबत मौन बाळगलं. मात्र हे विधेयक ऐतिहासिक असल्याचा प्रचार सुरु केल्यानंतर मस्क यांनी नाराजी व्यक्त करत, हे विधेयक अनाव्श्यक खर्चाचं उदाहरण असल्याची टीका केली.
त्यानंतर ट्रम्प प्रशासन आणि मस्क यांच्यात वाद रंगला. सरकारी सल्लागाराच्या भूमिकेत असलेल्या मस्क यांनी मुदत संपण्यापूर्वी दोन दिवस आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता आगामी काळात हा वाद आणखी रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.