मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी या मुंबईतील कॉलेजला 151 कोटी रुपयांचं दान दिलंय. अंबानी यांनी 1970 च्या दशकात याच कॉलेजातून शिक्षण घेतलं होतं.
सहा जून म्हणजे शुक्रवारी आयसीटी कॉलेजात प्राध्यापक एमएम शर्मा यांच्या आत्मचरित्राच्या कार्यक्रमाला मुकेश अंबानी यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलताना मुकेश अंबानी यांनी प्राध्यापक शर्मा आणि जे बी जोशी यांचा उल्लेख केला. इतर संस्कृतीत गुरु केवळ शिक्षक असतात, मात्र आपल्या संस्कृतीत गुरु हे परमेश्वर असल्याचा उल्लेख अंबानी यांनी केला.

2023-24 सालात 407 कोटींचं केलं दान
मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 2023-24 या आर्थिक वर्षात 407 कोटींचं दान केल्याची माहिती समोर आली आहे. एड्लविन हुरुर या भारताच्या दानशूर व्यक्तींच्या यादीत अंबानी दुसऱ्या क्रमांकावर होते. तर एचसीएलचे सह संस्थापक शिव नाडर यांनी 2023-24 या आर्थिक वर्षात सर्वाधिक दान दिल्याची माहिती समोर आलीय.
शिव नाडर यांच्याकडून किती दान?
शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबानं 2023-24 या आर्थिक वर्षात 2153 कोटी रुपयांचं दान केल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे नाडर यांनी सरासरी दरदिवशी 5.90 कोटींचं दान दिलंय. तर मुकेश अंबानी यांनी दर दिवशी 1.11 कोटी रुपयांचं दान केलं.
देशातील 2023-24 सालातील मोठे दानशूर
1. शिव नाडर फाऊंडेशन – 2153 कोटी
2. मुकेश अंबानी फाऊंडेशन – 407 कोटी
3. बजाज कुटुंबीय- 352 कोटी
4. कुमारमंगलम बिर्ला – 334 कोटी
5. गौतम अदानी – 330 कोटी
6. नंदन निलकेनी- 307 कोटी
7. कृष्णा चिवुकुला – 228 कोटी
8. अनिल अग्रवाल- 181 कोटी
9. सुश्मिता आणि सुब्रतो बागची- 179 कोटी
10. रोहिणी निलकेनी- 154 कोटी
मुकेश अंबानी आशियात सर्वात श्रीमंत
मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे 9.35 लाख कोटींची संपत्ती आहे. जगाचा विचार केला तर एलन मस्क हे सर्वाधिक संपत्तीधारक आहेत. त्यांच्याकडे 34.05 लाख कोटींची संपत्ती आहे.
शिव नाडर जगाच्या श्रीमंतांच्या यादीत 52 व्या स्थानी
79 वर्षांचे शिव नाडर हे एचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि शिव नाडर फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. जगातील श्रीमतांच्या यादीत त्यांचा क्रमांक 52 व्या स्थानी आहे. त्यांच्याकडे 3.12 लाख कोटींची संपत्ती आहे