श्रीनगर– पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्या 26 निरपराध भारतीयांचा जीव गेला, त्या हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानी असल्याची माहिती आता समोर येतेय. पाकिस्तानी सैन्यातील माजी एसएसजी कमांडो हाशिम मुसा हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचं समोर आलंय. मुसा सध्या लष्कर ए तोयब्बा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याची माहिती समोर आलीय.
पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या आदेशानंच पेहलगामचा हल्ला झाल्याची माहितीही समोर येतेय. लष्कर ए तोयबानं मुसाला काही महिन्यांपूर्वी भारतात पाठवलं होतं. सैन्यदल आणि काश्मिरी नसलेल्या व्यक्तींवर हल्ला करण्याची जबाबदारी मुसावर सोपवण्यात आली होती. मुसानं यापूर्वीही लष्करसाठी अशी ऑपरेसन्स यशस्वी केल्याची माहिती आहे.

ऑक्टोबर 2024 मध्ये गांदरबलमध्ये गगनगीरमध्ये मुसानं हल्ला केला होता. त्यात काही मजूर आणि स्थानिक डॉक्टरांचा बळी गेल्याची माहिती आहे. बारामुल्ला हल्ल्यातही मुसाचा सहभाग होता. या हल्ल्यात 2 सैन्यदलाचे जवान आणि इतर दोघांचा असा चौघांचा मृत्यू झाला होता.
पाकिस्तानची आगळीक सुरुच
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरातील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून दररोज आगळीक करण्यात येतेय. सीमावर्ती भागात पाक सैन्याकडून गोळीबाराच्या घटना सुरु आहेत. भारतीय सैन्यही याला चोख प्रत्युत्तर देतंय. खोऱ्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सैन्यदलाचं सर्च ऑपरेशन मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
काश्मिरातील 48 पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय
जम्मू आणि काश्मीरमधीलल तणावाची स्थिती लक्षात घेता राज्य सरकारनं सुरक्षिततेसाठी पावलं उचलली आहेत. काश्मिरातील 80 पैकी 48 पर्यटनस्थळं तात्पुरती बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आलाय. या हल्ल्यानंतरही भारतीय पर्यटक मात्र जम्मू काश्मीरमध्ये जाण्यापासून घाबरत नसल्याचं दिसतंय.
My letter to PM Modi requesting a special session of both houses of Parliament to be convened at the earliest.
At this critical time, India must show that we always stand together against terrorism. pic.twitter.com/7AIXGqBqTl
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 29, 2025
विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानं देशाचा मोठा धक्का बसला आहे. अशा स्थितीत भारत एकजूट असल्याचा संदेश जगाला देण्याची गरज असल्याचं मत राहुल गांधी यांनी या पत्रात व्यक्त केलंय. दहशतवादाविरोधात एकत्र उभे राहत असल्याचा संदेश बाहेर जाण्याची गरज असल्याचं मतही राहुल यांनी मांडलंय. उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राहुल गांधींनी पाठवलेल्या पत्रावर विचार होण्याची शक्यता आहे.