Amazonचे मालक जेफ बेझोस यांच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा, व्हेनिसमध्ये लग्नासाठी 400 कोटींचा खर्च, होतोय विरोध

या विवाह सोहळ्याला व्हेनिसच्या सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवलाय. जगातील वाढत्या असमानतेचा हा विवाह सोहळा उदाहरण असल्याचं सांगण्यात येतंय.

व्हेनिस- जगातल्या तिसरे श्रीमंत व्यक्ती असलेले अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांच्या लग्नाची चर्चा सध्या जगभरात सुरुये. वयाच्या 61 व्या वर्षी ते दुसऱ्यांदा लग्न करतायेत. ख्यातनाम टीव्ही न्यूज अँकर असलेली त्यांची 55 वर्षांची प्रेयसी लॉरेन सांचेझ हिच्यासोबत इटलीच्या सुंदर अशा व्हेनिस शहरात त्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. 27 जूनला होणाऱ्या शाही विवाह सोहळ्यामुळे हे लग्न चर्चेत आलंय.

कुबेरापेक्षाही धनवान अशी ओळख असलेल्या जेफ बेझोस यांच्या लग्नावर 400 कोटींचा खर्च करण्यात येतोय.
या विवाह सोहळ्याला व्हेनिसच्या सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवलाय. जगातील वाढत्या असमानतेचा हा विवाह सोहळा उदाहरण असल्याचं सांगत व्हेनिसमधील गरिबांची उपेक्षा यातून करण्यात येत असल्याचा आक्षेप नोंदवण्यात येतोय.

शतकातील सर्वात महागडं लग्न

व्हेनिसच्या पूर्वेला आर्सेनलमध्ये पाण्यानं वेढलेल्या विशाल संकुलात लग्नसोहळा पार पडणाराय. या लग्न सोहळ्यावर तब्बल 48 दशलक्ष युरो म्हणजे सुमारे 400 कोटी रुपये इतका खर्च होईल, असा अंदाज आहे. नवरी लॉरेन सांचेझच्या लग्नात घालण्यात येणाऱ्या कपड्यां वरच तब्बल 13 कोटी रुपये खर्च झालेत. जेफ बेझोस यांनी लॉरेनला साखरपुड्यातच 50 लाख डॉलर्सची गुलाबी हिऱ्याची अंगठी घातली होती. लग्न अतिशय शाही पद्धतीनं करण्यात येणार आहे. व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी 90 खासगी जेट्स व्हेनिस, ट्रेव्हिसो आणि वेरोना विमानतळांवर उतरणार आहेत. पाहुण्यांना लग्नमंडपात आणण्यासाठी 30 वॉटर टॅक्सी बुक करण्यात आल्यात. व्हेनिसमधील आलिशान हॉटेल्समध्ये पाहुण्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आलीय

जगभरातील मात्तबर मंडळी वऱ्हाडी

बिल गेट्स, एलोन मस्क, मार्क झुकरबर्ग, इवांका ट्रम्प, हॉलिवूड स्टार लिओनार्डो डिकॅप्रियो, किम कार्दशियन, केटी पेरी, डायन वॉन फर्स्टनबर्ग या पाहुण्यांचा या विवाह सोहळ्यातील वऱ्हाडींमध्ये समावेश आहे. सर्व पाहुणे गुरुवारपासूनच व्हेनिसमध्ये येतील आणि शनिवारी होणाऱ्या भव्य वेडींग पार्टीला उपस्थित राहतील. 2023 मध्ये बेझोस आणि सांचेझचा साखरपुडा देखील शाही थाटात पार पडला होता.

नो स्पेस फॉर बेझोस आंदोलन

झगमगाटात पार पडत असलेल्या या महागड्या लग्नसोहळ्याच्या विरोधात इटलीत आंदोलनं सुरू झालीत. ‘नो स्पेस फॉर बेझोस’ असे बॅनर फडकावत स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरलेत. या विरोधामुळं विवाहस्थळ देखील बदलावं लागलंय. शनिवारी लग्नाच्या दिवशी हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

जेफ हे सेलिब्रीटी नाहीत तर डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय असलेले अब्जाधीश असल्याचा आंदोलकांचा आक्षेप आहे. ट्रम्प यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष करण्यात जेफ यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. कामगारांच्या बाबत जेफ यांच्याकंपनीत आक्षेप असल्याचा दावा आंदोलकांचा आहे. युरोपीय देशांशी जेफ यांच्या कंपनीच्या करांचाही वाद असल्याचं सांगण्यात येतंय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News