पाकिस्तानी गुप्तहेरीच्या प्रकरणी दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या नौसेना भवनातील क्लार्क विशाल यादवच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी विशाल पैशांच्या लालसेपोटी पाकिस्तानी हँडलर्सना माहिती पुरवत असल्याचं समोर आलंय. ऑपरेशन सिंदूरबाबतही महत्त्वाची माहिती त्यानं पाकिस्तानी हँडलरला दिली होती. या बदल्यात त्याला 50 हजार रुपये मिळाले होते. आतापर्यंत त्याच्या खात्यात 2 लाख जमा झाल्याचं तपासात समोर आलंय.
फेसबुकच्या माध्ममातून विशालची पाकिस्तानी हँडरशी मैत्री झाल्याचं समोर आलं आहे. विशाल यादवला पाकिस्तानी हँडलरनं प्रिया शर्मा या नावानं फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरु झालं. दोघांनी एकमेकांना व्हॉट्सअप नंबरही शेअर केले होते. त्यानंतर टेलिग्रामचा वापर सुरु झाला. पाकिस्तानी हँडलर अनेक महिने विशाल यादवशी प्रिया शर्मा या नावानेच संपर्कात होती. त्यानंतर काही काळानं या हँडलरनं स्वत:चं खरं नाव विशाल यादवला सांगितलं. त्यानंतर भारतातील गुप्त माहितीसाठी पैसे देण्यात येतील असं आमिष दाखवलं, या जाळ्यात आरोपी विशाल ओढला गेला.

विशालच्या चौकशीदरम्यान धक्कादायक बाबी समोर
विशालच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सुरुवातीला माहितीच्या बदल्यात त्याला केवळ पाच ते सहा हजार रुपये मिळत होते. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर सुरू झालं. त्यावेळी पाकिस्तानी हँडलरनं सांगितलं की, चांगली माहिती देशील तर तुला जास्त पैसे देण्यात येतील. यावर विशालनं ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान नौदल आणि इतर विषयांबाबतची महत्त्वाची माहिती या महिला पाक हँडलरला दिली. या बदल्यात त्याला 50 हजार रुपये मिळाले. विशालनं सुरुवातीचे दीड ते दोन लाख रुपये स्वत:च्या खात्यात मागवले होते. काही पैसे क्रिप्टो करन्सी अकाऊंटमध्येही घेण्यात आले.
विशालला ऑनलाइन गेमिंगचं वेड…
विशाल हा डायरेक्टर ऑफ डॉकयार्डमध्ये क्लर्क म्हणून कार्यरत होता. दिल्लीतील नौसेना भवनात कार्यरत असलेला विशाल हा पाकिस्तानी हँडलरच्या सोशल मीडियावर संपर्कात असल्याची माहिती राजस्थानच्या सीआयडीला मिळाली. नौसेना भवनातील गोपनीय माहिती पैशांसाठी विशाल पाकिस्तानला देत होता. त्यानंतर विशाल आणि त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर ठेवण्यात आली. याचे पुरावे मिळाल्यानंतर विशालला जयपूरला आणण्यात आलं चौकशी करण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आली.
आत्तापर्यंतच्या तपासात विशालला ऑनलाईन गेमिंगचा छंद असल्याचं समोर आलंय. त्याच्या मोबाईलच्या फोरेन्सिक चाचणीत पैशांची देवाणघेवाण, सामरिक सूचना, मोबाइल संभाषण समोर आलंय. आरोपी विशालनं ऑपरेशन सिंदूरच्या काळात नौदल आणि इतर खात्यांची गोपनीय माहिती पाक हँडलरला दिल्याचं उघड झालंय.