मुंबई- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्र आणि पहिलीपासून हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषेच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झालेले आहेत. राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारनं अनिवार्य हा शब्द गाळला असला तरी हिंदी भाषेची छुपी सक्ती होत असल्याचा आरोप मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय.
राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत हिंदी वा तिसऱ्या भाषेबाबतचा निर्णय सर्व घटकांशी चर्चा करुन नंतर लागू करण्यात येईल, असा निर्णय घेतला. त्यानुसार शिक्षणमंत्री दादा भुसे चर्चेसाठी राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. मात्र राज ठाकरे आणि दादा भुसे यांच्या चर्चेत काहीही निष्पन्न झालं नाही. त्यानंतर पत्रकार परिषद घेत 5 जुलैला मुंबईत झेंड्याविना मोर्चा काढण्याची घोषणा राज ठाकरेंनी केलीय. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही हिंदी विरोधी कृती समितीच्या सदस्यांची भेट घेतल्यानंततर पत्रकार परिषदेत हिंदी भाषेला विरोध असेल अशी भूमिका मांडलीय. 7 जुलैला हिंदी विरोधी धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय.

राज ठाकरेंकडून मोर्चाची घोषणा
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मांडलेली भूमिका फेटाळून लावल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. हिंदी सक्तीच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देताना येत्या 6 जुलैला मुंबईत गिरगाव चौपाटीवर मराठी माणसांचा मोर्चा या विषयावर काढणार असल्याची घोषणा राज यांनी केली आहे. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा असणार नाही, असं सांगत सर्वपक्षीयांनी यात सहभागी व्हावं असंही राज ठाकरे म्हणालेत. या मोर्चात कोण कोण सहभागी होतं ते पाहू, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंनाही सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय.
बाटेंगे तो काटेंगे भाजपाचं धोरण-उद्धव ठाकरे
भाजपा राज्यात भाषिक आणीबाणी लादत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. मराठी बचाव समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 7 जुलै रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलोन करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. मराठी तित्रपटसृष्टीतील कलाकार, खेळाडू, साहित्यिक आणि सर्वपक्षीय मराठीप्रेमींनी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहनही करण्यात आलंय.
ठाकरे बंधूंची हिंदीवरुन एकी
गेल्या काही दिवसांपासून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून टाळीसाठी सातत्यानं हात पुढं करण्यात येतोय. मात्र राज ठाकरे या विषयावर मौन बाळगून आहेत. आता हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी विरोधाची भूमिका घेतली आहे. आता या दोन्ही आंदोलनात ठाकरे बंधू एकत्र दिसणार का, आणिही युती आगामी महापालिका निवडणुकीत पाहायला मिळणार का याची चर्चा सध्या सुरु आहे.