मूळ कोल्हापुरी चप्पल कुठे बनवल्या जातात? खरी आणि खोटी कशी ओळखायचं? जाणून घ्या

सध्या ‘कोल्हापुरी चप्पल’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. त्याला कारण ठरले आहे प्रसिद्ध इटालियन फॅशन ब्रँड प्राडाचा एक फॅशन शो, ज्यामध्ये कोल्हापुरी चपलेसारख्या डिझाइनची चप्पल रॅम्पवर सादर करण्यात आली. या गोष्टीचे काहींनी स्वागत केले आणि भारतीय वारशाचे जागतिकीकरण म्हणून पाहिले, तर काहींनी यावर टीका केली कारण शोमध्ये कोल्हापुरी चपलांमागील भारतीय पार्श्वभूमीचा कुठेही उल्लेख नव्हता.

कोल्हापुरी चप्पल केवळ पायातील वस्तू नाही

कोल्हापुरी चप्पल म्हणजे फक्त पायात घालण्याची वस्तू नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. या चपलेचा इतिहास शेकडो वर्षांपासूनचा आहे. तिचा उगम १२व्या शतकात झाल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे शाहू महाराजांच्या काळात या चपलांना ‘कोल्हापुरी’ म्हणून ओळख मिळाली. असे सांगितले जाते की खुद्द शाहू महाराज या चपला घालत असत.

या चपला केवळ त्यांच्या सौंदर्यामुळेच नव्हे, तर त्याच्या टिकाऊपणामुळे, नैसर्गिक प्रक्रियेने निर्मितीमुळे आणि हातमागावरील कुशल कारागिरीमुळे खास ठरतात.

कुठे आणि कशा बनतात कोल्हापुरी चप्पल?

या चपला प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात बनवल्या जातात. स्थानिक भाषेत त्यांना ‘पायताण’ असेही म्हणतात. कोल्हापुरातील उष्ण आणि दमट हवामानातही या चपला वर्षानुवर्षे टिकून राहतात.

बनवण्याची प्रक्रिया:

चपलेसाठी म्हशीच्या चामड्याचा वापर होतो.

हे चामडे बाभळीच्या साली व चुना यांसारख्या नैसर्गिक घटकांद्वारे प्रक्रिया करून तयार केलं जातं.

चामड्याला आवश्यक त्या आकारात कापून, सुती किंवा नायलॉन धाग्याने शिवले जाते.

त्यानंतर त्यावर पारंपरिक कढाई, बारीक छिद्रकाम केले जाते आणि नैसर्गिक तेलाने मऊपणा आणला जातो.

काही खास डिझाईन्समध्ये मोती, लटकन आणि नक्षीदार सजावट केली जाते.

ओळखा खरी-खोटी कोल्हापुरी खऱ्या कोल्हापुरी चपलेची लक्षणं:

हाताने बनवलेली असते.

नैसर्गिक चामड्याचा विशिष्ट गंध येतो.

बारीक कढाई, मजबूत शिवण आणि साधे पण आकर्षक रंग.

चालताना एक खास ‘टकटक’ आवाज येतो – जो चपलेच्या तळाशी लावलेल्या बियामुळे होतो.

नकली कोल्हापुरीची ओळख:

प्लास्टिक किंवा सिंथेटिक मटेरियलचा वापर.

अतिशय चमकदार रंग आणि कृत्रिम पॉलिश.

चपलेत ‘टकटक’ आवाज येत नाही.

शिवण आणि फिनिशिंग अनेक वेळा कमजोर असते.

जागतिक पातळीवर कोल्हापुरीची ओळख

कोल्हापुरी चपलांना GI (Geographical Indication) टॅग मिळालेला आहे, ज्यामुळे त्या कोल्हापूरच्या पारंपरिक वारशाचा अधिकृत भाग आहेत. यामुळे त्या भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही लोकप्रिय ठरल्या आहेत. फॅशन इंडस्ट्रीतील ब्रँड्ससुद्धा आता या पारंपरिक वस्तूंना नवीन रूपात मांडत आहेत.

तथापि, या प्रकारच्या जागतिक सादरीकरणात भारतीय पारंपरिक वारशाचा उल्लेख होणे अत्यावश्यक आहे. कोल्हापुरी चप्पल ही केवळ एक डिझाइन नसून, ती महाराष्ट्राच्या हस्तकलेचा, शतकानुशतक चालत आलेल्या कारागिरीचा आणि सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News