तिबेटी धर्मगुरू दलाई लामा सध्या चर्चेत आहेत. 6 जुलै रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या उत्तराधिकारीच्या निवडीबाबत मोठा निर्णय जाहीर केला, ज्यावर चीनने तीव्र आक्षेप घेतला आहे. चीनने पुन्हा एकदा म्हटले आहे की, तिबेटी धर्मगुरूंच्या उत्तराधिकारीच्या निवडीचा अधिकार दलाई लामांकडे नाही.
चीन आणि दलाई लामा यांच्यातील वाद अधिक गडद होत असतानाच, भारतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतातील खासदारांच्या सर्वपक्षीय फोरमकडून दलाई लामांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारत रत्न’ देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रस्तावावर आतापर्यंत ८० खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. लवकरच हा प्रस्ताव पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.

मात्र, यावर एक प्रश्न उपस्थित होतो, दलाई लामा परदेशी नागरिक असल्यामुळे त्यांना भारत रत्न देता येईल का? आणि याआधी किती परदेशी नागरिकांना हा सन्मान मिळाला आहे?
दलाई लामा भारतीय नागरिक नाहीत
हा प्रश्न यासाठीही महत्त्वाचा ठरतो कारण दलाई लामा हे भारतीय नागरिक नाहीत. जरी ते 1959 पासून भारतात निर्वासित म्हणून राहत असले तरी त्यांनी आजवर भारतीय नागरिकत्व स्वीकारलेले नाही. चीनने तिबेटवर ताबा मिळवल्यानंतर दलाई लामा हजारो समर्थकांसह भारतात आले आणि त्यांनी धर्मशाळा येथे मुख्यालय स्थापन केले. तिथूनच त्यांच्या निर्वासित सरकारचे संचालन देखील केले जाते.
किती परदेशी नागरिकांना मिळाला भारत रत्न?
‘भारत रत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. नावावरूनच हे स्पष्ट होते की हा सन्मान मुख्यत्वे भारतीय नागरिकांनाच दिला जातो. मात्र, काही अपवादही आहेत.
आत्तापर्यंत तीन परदेशी नागरिकांना भारत रत्न देण्यात आले आहे:
खान अब्दुल गफ्फार खान – पाकिस्तानी नागरिक
नेल्सन मंडेला – दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष
मदर टेरेसा – जन्माने अल्बेनियन, पण नंतर भारतीय नागरिकत्व स्वीकारले
म्हणूनच, नियमांत थोडी लवचिकता आहे. केंद्र सरकारच्या शिफारसीवर राष्ट्रपती हे अंतिम निर्णय घेतात. त्यामुळे दलाई लामा यांना भारत रत्न देण्याचा मार्ग बंद नाही, जरी ते भारतीय नागरिक नसले तरीही.