Mansson Session – पावसाळी अधिवेशनात आज दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी विरोधकांनी राज्यातील विविध प्रश्नावरुन विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्य़ा विरोधात आंदोलन केले. तारांकित प्रश्नावरुन आज सभागृहात विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यानंतर राज्यात होणाऱ्या भेसळयुक्त तेल आणि रेशन तांदळाच्या गैरव्यवहाराबाबत विरोधक विधानसभेत आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले.
तांदळात मोठी भेसळ
शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यात येणारा तांदूळ हा दुकानदार मालक खरेदी करून अन्य ठिकाणी विकत असल्याची बाब जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा यांच्या निदर्शनास आलेली नाही आहे. तरीसुद्धा याबाबत चौकशी करून आणि जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. रेशन दुकानदार हे तांदळामध्ये प्लास्टिक वापरत आहेत. तांदळात मोठी भेसळ होत आहे. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. याला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, प्लास्टिक हे तांदळापेक्षाही महाग आहे. मग तांदूळ प्लास्टिकचा कसा असेल?

तांदळात मोठा गैरव्यवहार…
भंडारा जिल्ह्यात अनेक गावातून रेशन तांदूळ छोट्या व्यापाऱ्यांकडून मोठ्या व्यापाऱ्यांना विकला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्राधान्यगट अंत्योदय आणि एपीएल शिधापत्रिकेवर लाभार्थ्याचे रेशन धान्य पुरवले जात असून, काही लाभार्थी हे रेशनचे तांदूळ विकत घेत नसल्यामुळे शिधापत्रिकेवर मिळत असलेले तांदूळ दुकान मालकच विकत असून, ग्रामीण भागात हा तांदूळ 22 ते 25 रुपये किलो भावाने विकला जात आहे. असा गंभीर आरोप आमदार नाना पटोलेंना केला. दरम्यान, रेशनच्या तांदळाबाबत मोठा गैरव्यहार होत असून, यात तांदूळ दलाल यांच्या पोटात जात आहे.