अहमदाबाद: अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवाशी बचावला आहे. रमेश विश्वकुमार असे या व्यक्तीचे नाव असून तो 11A या सीट नंबरवर बसला होता. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रमेश विश्वकुमारची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. रमेश विश्वकुमार या अपघातामध्ये नेमका कसा वाचला, याबाबत विविध चर्चा सुरु आहे. मात्र यादरम्यान स्वत: रमेश विश्वकुमारने महत्वाची माहिती दिली आहे.
रमेश विश्वकुमारांनी सांगितली हकिकत
“विमानाचा ज्या भागात माझी सीट होती तो भाग इमारतीच्या खालच्या भागात आदळला असावा. वरच्या भागात आग लागली होती, तिथे बरेच लोक अडकले होते. मी सीटसह खाली पडलो होतो. मी कसा तरी बाहेर पडण्यात यशस्वी झालो. दरवाजा तुटलेला होता आणि जेव्हा मला समोर काही रिकामी जागा दिसली तेव्हा मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला एक भिंत होती, कदाचित तिथून कोणीही बाहेर पडू शकले नाही. रमेश विश्वकुमार म्हणाला की, त्याच्या डोळ्यासमोर दोन एअर होस्टेस, एक काका, काकू आणि सगळं जळत होते. ” या अपघातात विश्वासचा डावा हात गंभीरपणे भाजला, पण त्याचा जीव वाचला.

ब्लॅक बॉक्समुळे अपघाताचं रहस्य उलगडणार
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. या अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 12 जण क्रू मेंबर होते. दरम्यान, एनएसजीने क्रॅश झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळवला आहे आणि ते आता अपघाताची कारणे शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशी बातमी समोर आली आहे. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय आणि त्याच्या मदतीने विमानाच्या अपघाताची रहस्ये कशी उलगडू शकतात.
‘ब्लॅक बॉक्स’ हे दोन केशरी रंगाचे अतिशय मजबूत उपकरण असतात. भीषण अपघातात देखील हे उपरकरण सुरुक्षित राहावे यासाठी ते अतिशय मजबूत बनवण्यात येते. यातील एक फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) असते आणि ते विमानाची उंची, वेग, इंजिनची स्थिती आणि पायलटने केलेल्या प्रत्येक तांत्रिक कृतीची नोंद करते. दुसरे उपकरण कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) असते आणि ते पायलटचे संभाषण, कंट्रोल टॉवरशी रेडिओ संपर्क आणि कॉकपिटमधील इतर आवाजांची नोंद करते.