अहमदाबाद विमान दुर्घटनेचं गूढ उकलणार; ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला!

अहमदाबाद विमान दुर्घटनेचं गुढ आता उकलणार आहे. कारण, या विमानातील ब्लॅक बॉक्स आता सापडला आहे. त्यामुळे या अपघाताचे खरे कारण आता समोर येणार आहे.

अहमदाबाद: एअर इंडिया विमान अपघाताचं गूढ उकलणार आहे. कारण विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला आहे. या ब्लॅक बॉक्समुळे विमान अपघाताचं नेमकं कारण समजणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विश्लेषणासाठी हा ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आला आहे, तर दुसरा ब्लॅक बॉक्सचा अजून शोध घेतला जात आहे. दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा लवकरच शोध लागण्याची शक्यता आहे.

अपघाताचे रहस्य उलगडणार!

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. या अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 12 जण क्रू मेंबर होते. दरम्यान, एनएसजीने क्रॅश झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळवला आहे आणि ते आता अपघाताची कारणे शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशी बातमी समोर आली आहे. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय आणि त्याच्या मदतीने विमानाच्या अपघाताची रहस्ये कशी उलगडू शकतात.

‘ब्लॅक बॉक्स’ हे दोन केशरी रंगाचे अतिशय मजबूत उपकरण असतात. भीषण अपघातात देखील हे उपरकरण सुरुक्षित राहावे यासाठी ते अतिशय मजबूत बनवण्यात येते. यातील एक फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) असते आणि ते विमानाची उंची, वेग, इंजिनची स्थिती आणि पायलटने केलेल्या प्रत्येक तांत्रिक कृतीची नोंद करते. दुसरे उपकरण कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) असते आणि ते पायलटचे संभाषण, कंट्रोल टॉवरशी रेडिओ संपर्क आणि कॉकपिटमधील इतर आवाजांची नोंद करते.

अमेरिकन संघटना नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) नुसार, ब्लॅक बॉक्स 25 तासांपर्यंत सतत उड्डाणाची माहिती रेकॉर्ड करतो. अहमदाबाद अपघातात ही माहिती खूप महत्त्वाची ठरेल. कारण या अपघातामागे तांत्रिक बिघाड, इंजिनमध्ये बिघाड, पायलटची चूक किंवा इतर कोणते कारण होते हे या ब्लॅक बॉक्सच्या विश्लेशनातून कळू शकणार आहे.

पंतप्रधान मोदी करणार पाहणी

या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच आज ते अहमदाबादला भेट देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी घटनास्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतील. मोदी आज सकाळी 8:30 च्या सुमारास अहमदाबादला पोहोचतील आणि अपघातस्थळाला भेट दिल्यानंतर रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करतील. अहमदाबादमधील या भीषण दुर्घटनेवर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News