इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचलेले पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला १५ जुलैला पृथ्वीवर परत येण्याची शक्यता आहे. त्यांचे अंतराळयान १४ जुलैला त्यांचे तीन सहकारी अंतराळवीरांसह पृथ्वीच्या दिशेने प्रस्थान करेल. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार १५ जुलै रोजी सुमारे सकाळी ३ वाजता शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परत येतील. त्यांच्या यानाची लँडिंग अमेरिकेच्या कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळील पॅसिफिक महासागरात होणार आहे.
एक्सिओम-४ मिशन आणि प्रयोग
नासाच्या एक्सिओम-४ (Axiom-4) मिशनअंतर्गत शुभांशु शुक्ला २६ जून रोजी इतर तीन अंतराळवीरांसह इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचले होते. या कालावधीत शुभांशु यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग केले, ज्यात स्पेस स्टेशनमध्ये मूग आणि मेथी यांची शेती करण्याचाही समावेश होता.

पेट्री डिशमध्ये मूग आणि मेथीची शेती
अंतराळात शुभांशु यांनी ‘शेतकरी’ म्हणूनही आपली भूमिका बजावली. त्यांनी मूग आणि मेथीच्या बिया पेट्री डिशमध्ये लावल्या आणि त्या ISS मधील फ्रीझरमध्ये ठेवण्यात आल्या. या प्रयोगाचा उद्देश सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा बीजांकुरण व वनस्पतींच्या सुरुवातीच्या वाढीवर काय परिणाम होतो, हे समजून घेणे हा होता.
शुभांशु परतल्यावर पिकांची काळजी कोण घेणार?
जर हवामान आणि अन्य अटी अनुकूल राहिल्या, तर शुभांशु शुक्ला १४ जुलैला स्पेस स्टेशन सोडतील. अशा परिस्थितीत प्रश्न उठतो त्यांच्या अनुपस्थितीत तेथील उगवलेली झाडे आणि बिया कशा प्रकारे जपल्या जातील?
याचे उत्तर स्पेस शेतीच्या पद्धतीत दडलेले आहे. स्पेसमध्ये रोपांसाठी खास प्रकारची पिलो डिझाईन तयार केली जाते. हे एक प्रकारचे चेंबर असते, जे रोपांच्या मुळांपर्यंत पाणी, पोषणद्रव्ये, ऑक्सिजन आणि खत पोहोचवते. गुरुत्वाकर्षणाची कमतरता आणि सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे, या झाडांना आर्टिफिशियल न्यूट्रिएंट्स दिले जातात. त्यामुळे तिथे पाण्याची किंवा खताची वेगळी गरज राहत नाही.