लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारताला इंग्लंडकडून २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताला दुसऱ्या डावात १९३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. रवींद्र जडेजाने शेवटपर्यंत झुंज दिली, त्याने ६१ धावांची झुंजार खेळी साकारली. मात्र, इतर फलंदाजांचा साथ न मिळाल्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय संघाच्या या पराभवामागे काही ठळक चुका होत्या, ज्यामुळे विजय हातून निसटला.

यशस्वी जैस्वाल अपयशी
या मालिकेतील पहिल्या चार डावांत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावणाऱ्या यशस्वी जायसवालने २२२ धावा केल्या होत्या. मात्र, लॉर्ड्सच्या कठीण खेळपट्टीवर त्याला आपली कामगिरी टिकवता आली नाही. दोन्ही डावांत मिळून तो केवळ १३ धावाच करू शकला. सलामीवीर अपयशी ठरल्याने मधल्या फळीवर अतिरिक्त दबाव आला.
नाईट वॉचमनसाठी घेतलेला चुकीचा निर्णय
इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांत संपुष्टात आल्यावर भारताची फलंदाजी सुरू झाली. दिवशीचा खेळ संपायच्या अगोदरच तीन गडी बाद झाल्याने भारताने आकाशदीपला नाईट वॉचमन म्हणून पाठवले. मात्र, तो लगेचच क्लीन बोल्ड झाला. हा निर्णय स्पष्टपणे टीम इंडियाच्या डिफेन्सिव्ह मानसिकतेचे उदाहरण होता. त्या क्षणी ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी किंवा वॉशिंग्टन सुंदर यांना पाठवून दबावाला प्रत्युत्तर देता आले असते.
कर्णधार शुभमन गिल दबावाखाली आला
संघाचा कर्णधार आत्मविश्वासात असेल तर संपूर्ण संघात सकारात्मकता दिसते. मात्र, लॉर्ड्स टेस्टमध्ये शुभमन गिल स्वतःच दबावाखाली खेळताना दिसला. त्यांनी दोन्ही डावांत मिळून केवळ २२ धावा केल्या. दुसऱ्या डावात तर केवळ ९ चेंडूंमध्येच त्यांची विकेट गेली आणि त्याआधी अनेक चेंडूंवर तो बीट होत होता.
रवींद्र जडेजाने शेवटपर्यंत संघर्ष दिला, पण इतर फलंदाजांनी साथ न दिल्याने भारताला हार पत्करावी लागली. आता उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवून भारताला मालिका वाचवावी लागेल.