नवी दिल्ली- कोरोनाच्या संकटावर मात करत भारतानं जागतिक पातळीवर चौथी अर्थव्यवस्था असा नावलौकिक मिळवण्यात यश मिळवलंय. जपानला मागे टाकत हा मान भारतीय अर्थव्यवस्थेनं मिळवलाय. निती आयोगाचे सीईओ व्ही आर सुब्रमण्यम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राबवण्यात आलेल्या आर्थिक धोरणांमुळे हे यश भारताला मिळाल्याचं सांगण्यात येतंय.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएणएफच्या आकडेवारीचा आधार देत सुब्रमण्यम यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था झाल्याचं सांगितलंय. भारताची अर्थव्यवस्था आता 4 ट्रिलियन डॉलर्स इतकी मोठी असल्याचंही त्यांनी सांगितलं. जपानपेक्षा भारताची अर्थव्यवस्था मोठी असून, आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीन देश भारताच्या पुढे असल्याचंही ते म्हणालेत.

लवकरच तिसऱ्या स्थानी घेणार झेप
भारतानं सध्याच्या आर्थिक धोरणानुसार वर्तणूक ठेवली, तर येत्या अडीच ते तीन वर्षांत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याची संधी भारताला असल्याचंही सुब्रमण्यम यांनी सांगितलंय. एप्रिल 2025 च्या वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूट रिपोर्टनुसार, भारताचा साधारण जीडीपी हा 40187 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहचलाय. तर जपानचा अनुमानित जीडीपी हा 40186 डॉलर्सपेक्षा थोडा जास्त आहे.
भारताला मिळालेलं हे यश अंतर्गत मागणी, धोरणांमधील सुधारणांमुळे शक्य झाल्याचं सांगण्यात येतंय. भारताचा आर्थिक विकास दर हा 6 ते 7 टक्क्यांच्या आसपास आहे आणि त्यात सातत्य पाहायला मिळतंय. तर जपानच्या अर्थव्यवस्थेला जागतिक व्यापारातील तणावाचा आणि धोरणातील बदलांचा फटका बसल्याचं सांगण्यात येतंय.
जागतिक पातळीवर काय परिणाम
भारताची अर्थव्यवस्था चौथ्या स्थानी आल्यामुळे आंतरराषअट्रीय पातळीवर भारताची पत वाढणार आहे. जी-20 आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या संस्थांच्या पातळीवर भारताचा प्रभाव वाढणार आहे.भारतात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीत यामुळे आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवरील कंपन्या भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहू लागल्या आहेत.
भारत आणि जपानमध्ये असलेल्या मजबूत संबंधांमुळे चंद्रयान 5, सैन्य सहकार्य आणि भारत-प्रशांत क्षेत्रात स्थिरता वाढण्यास मदत होणार आहे.जागतिक पातळीवर आर्थिक क्षेत्रातील नेतृत्वाच्या दिशेनं ही भारताची पावलं पडत असल्याचं यामुळं मानण्यात येतंय. 2028 साली जर्मनीला मागे टाकत भारत तिसऱ्या स्थानी पोहचणं, हे महासत्तेच्या दिशेची सुरुवात ठरेल.