इस्रायलने अण्वस्त्रे कशी तयार केली? सध्या त्यांच्याकडे किती बॉम्ब आहेत?

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध आता अशा टप्प्यावर पोहोचले आहे की जिथून परत येणे खूप कठीण ठरू शकते. याच दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यांनी इराणला अधिक चिथावले असून, त्यानंतर इराणी क्षेपणास्त्रांनी इस्रायलमध्ये हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. मध्य पूर्वेतील या संघर्षामागे मुख्य कारण म्हणजे अण्वस्त्र, ज्यासाठी इराण गेल्या अनेक दशकांपासून इस्रायल आणि इतर पाश्चिमात्य देशांशी संघर्ष करत आहे.

इस्रायलला अण्वस्त्रांपासून का वाटतो धोका?

इस्रायलला वाटते की, जर इराणने अण्वस्त्रं तयार केली, तर ते इस्रायलच्या अस्तित्वासाठीच धोका ठरू शकतात. त्यामुळेच इस्रायल कोणत्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्र संपन्न देश होऊ देणार नाही. विशेष बाब म्हणजे इस्रायल स्वतः एक अण्वस्त्र संपन्न देश आहे. मग प्रश्न उभा राहतो की, इस्रायलने अण्वस्त्रं कशी तयार केली? जगाला याची कल्पना कधी आली? आणि सध्या त्यांच्याकडे किती अण्वस्त्रं आहेत?

इस्रायलकडे किती अण्वस्त्रं आहेत?

इस्रायल हा एक घोषित न केलेला अण्वस्त्र संपन्न देश मानला जातो. म्हणजेच, इस्रायलने कधीही अधिकृतपणे मान्य केलेले नाही की त्याच्याकडे अण्वस्त्रं आहेत, आणि त्याचा त्यांनी इन्कारही केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या अण्वस्त्र क्षमतेचा नेमका अंदाज घेणे कठीण असते.

परंतु फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स आणि स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार, इस्रायलकडे सध्या सुमारे 90 अण्वस्त्रं असावीत. काही तज्ञांच्या मते, ही संख्या भारत आणि पाकिस्तानच्या बरोबरीची म्हणजेच 200 अण्वस्त्रांपर्यंत पोहोचू शकते.

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल यांच्या एका लीक झालेल्या ईमेलमध्येही उल्लेख आहे की इस्रायलकडे 200 अणुबॉम्ब आहेत आणि त्यांचं मुख्य लक्ष्य इराण आहे.

इस्रायलने अण्वस्त्रं कशी बनवली?

इस्रायल हा जगातील काही मोजक्या देशांपैकी एक आहे, ज्याने परमाणु अप्रसार करार (NPT) वर कधीही स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे त्याच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबद्दल फारशी माहिती जगासमोर उघड आलेली नाही.

  • 1952 मध्येच इस्रायलने आपला परमाणु ऊर्जा आयोग स्थापन केला होता.

  • 1958 मध्ये त्यांनी डिमोना शहराजवळ गुप्तपणे अण्वस्त्र तयार करण्यास सुरुवात केल्याचे मानले जाते.

  • 1967 मध्ये इस्रायलने गुप्तपणे अण्विस्फोटक बनवण्याची क्षमता विकसित केली.

  • 1973 मध्ये अमेरिकेलाही खात्री झाली की इस्रायलकडे अण्वस्त्रं आहेत.

विशेष म्हणजे, इस्रायलने अण्वस्त्र तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल गुप्तपणे त्या देशांकडून घेतला, जे आज NPT चे सदस्य आहेत. या देशांनी हे पाहिले असूनही दुर्लक्ष केले की इस्रायल या वस्तूंचा उपयोग अण्वस्त्र निर्मितीसाठी करतो आहे.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News