राज्यातील काही जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज काय?

हवामान विभागाने राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर विदर्भ, मराठवाड्याची पावसाची प्रतीक्षा कधी संपणार, हा प्रश्न कायम आहे.

राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सातत्याने पाऊस सुरू आहे. असं असले तरी मराठवाडा आणि विदर्भाची पावसाची प्रतीक्षा काही अजून संपलेली दिसत नाही.  आजचा हवामान विभागाचा अंदाज समोर आला आहे, त्यानुसार गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईसाठी यलो अलर्ट तर दक्षिण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना आणि मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या रहिवाशांनीही सतर्क रहावे.

मुंबई शहर आणि कोकणात पाऊस बरसणार

मे महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर जूनच्या सुरुवातीला पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सध्या दडी मारली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. आता मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनने आता पुन्हा एकदा जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. पुढील दोन-तीन दिवसांत मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून अधिक सक्रिय होणार आहे. या काळात मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्रातील काही भागात पावसाची संततधार

या सर्व जिल्ह्यांतील नागरिकांना आणि विशेषतः मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. अचानक येणाऱ्या जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. एकूणच पुढील काही दिवस महाराष्ट्रात दमदार मान्सून होईल, असा अंदाज आहे.

विदर्भ-मराठवाड्याला चांगल्या पावसाची प्रतीक्षा

दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्याची चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शेतीचे अनेक कामे चांगल्या पावसाअभावी रखडली आहेत. त्यामुळे या भागात पावसाची प्रतीक्षा आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News