सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्ग सहापदरी होणार, मुख्यमंत्री आणि गडकरींच्या बैठकीत मोठा निर्णय

विस्तारित रस्त्यांमुळे भाविकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर यात्रा सुनिश्चित होईल. विशेषतः द्वारका सर्कलचा विकास दोन टप्प्यांमध्ये केला जाणार आहे. याशिवाय, नाशिक ते त्र्यंबक हा मार्ग सहापदरी करण्यात येणार आहे

नागपूर – प्रयागराजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभमेळ्यानंतर महाराष्ट्रात २०२७ साली नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठीची तयारी सरकारच्या वतीनं सुरु करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत नाशिकमध्ये बैठक पार पडल्यानंतर आता केंद्र सराकारशी सिंहस्थाबाबत विचारविनिमय आणि विकासकामांची चर्चा सुरु झालीय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेत नागपूरमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या ‘सिंहस्थ कुंभमेळा’च्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात बैठक पार पडली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील संभाव्य गर्दी आणि वाहतूक व्यवस्थेचा विचार करता, संबंधित बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या विकासास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. लवकरच या रस्त्याचा डीपीआर तयार करून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबई, गुजरात, पालघर, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे अशा प्रमुख मार्गांनी नाशिककडे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. यामुळे या मार्गांच्या सक्षमीकरणासोबतच नाशिक जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

कुंभमेळ्यासाठी मार्गाचे विस्तारीकरण-गडकरी

कुंभमेळ्यातील प्रचंड वाहतूक भार लक्षात घेता या मार्गांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी जवळपास सर्व रस्त्यांना तत्वतः मान्यता दिलेली आहे. लवकरच त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, काम पूर्णत्वास नेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

नाशिक त्र्यंबक रस्ता सहापदरी करणार- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विस्तारित रस्त्यांमुळे भाविकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर यात्रा सुनिश्चित होईल. विशेषतः द्वारका सर्कलचा विकास दोन टप्प्यांमध्ये केला जाणार आहे. याशिवाय, नाशिक ते त्र्यंबक हा मार्ग सहापदरी करण्यात येणार आहे आणि नाशिक रिंगरोडलाही मंजुरी देण्यात आली आहे.

या मार्गांचं सक्षमीकरण

१. घोटी – पाहिने – त्र्यंबकेश्वर – जव्हार फाटा
२. द्वारका सर्कल – सिन्नर (समृद्धी महामार्ग) – नांदूर शिंगोटे – कोल्हार
३, नाशिक ते कसारा,सावली विहीर ( शिर्डी – शनिशिंगणापूर फाटा
४. नाशिक ते धुळे
५. त्र्यंबकेश्वर – जव्हार – मनोर
६. सावली विहीर – मनमाड – मालेगाव
७. घोटी – सिन्नर – वावी – शिर्डी
८. शनिशिंगणापूर फाटा – अहिल्यानगर (खरवंडी फाटा)


About Author

Smita Gangurde

Other Latest News