अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा दुसऱ्यांदा सांभाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पहिल्या औपचारिक दौऱ्यासाठी बाहेर पडलेत. सौदी अरबच्या क्राऊन प्रिन्सच्या भेटीनंतर ते कतार आणि दुबईत जाणार आहेत. कतारचाट्रम्प यांचादौरा सध्या विशेष चर्चेत आहे, याचं कारण आहे त्यांना मिळणारं गिफ्ट. कतार सरकार ट्रम्प यांना 3400 कोटी रुपयांचं लक्झरी बोईंग जंबोजेट गिफ्ट करणार आहे. या विमानाची किंमत 400 मिलियन डॉलर्स इतकी मोठी आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या इतिहासात इतकं मोठं गिफ्ट मिळवणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत. ट्रम्प यांच्या कतार दौऱ्यात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र हे गिफ्ट ट्र्मप यांना लगेच मिळणार नाहीये. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेचे सर्व निकष तपासल्यानंतर हे जम्बो विमान ट्रम्प यांना मिळणार आहे. 2029 साली राष्ट्राध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याच्या काही काळ आधी ट्रम्प या विमानाचा वापर करु शकणार आहे.

जंबो जेट नव्हे फ्लाईंग पॅलेस
बोईंग 747-8ला फ्लाईंड पॅलेस म्हणजे उडता राजवाडा असं संबोधण्यात येतं. लक्झरी सुविधांसाठी हे विमान जगात प्रसिद्ध आहे. बोईंग 747 सीरिजमधील हे लेटेस्ट आणि सर्वात मोठं वर्जन असल्याचं सांगण्यात येतंय. व्हीआयपींची खास सेवा पुरवणाऱ्या सर्व सोयीसुविधा या जेटवर उपलब्ध आहेत. या विमानात 40 ते 100 प्रवाशांच्या राहण्यासाठी स्वतंत्र सूट्सही व्यवस्था आहे. यात मास्टर बेडरुम, कॉन्फरन्स रुम, डायनिंग एरिया, लाऊंज आणि बाथरुम यांचा समावेश आहे. हे विमान 1100 किमी, प्रति तास या वेगानं धावणार असून, सुरक्षेसाठीच्या तगड्या यंत्रणाही या विमानात बसवण्यात आल्यात.
पदावरुन निवृत्त झाल्यानंतरही ट्रम्प वापरु शकणार विमान
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे असलेल्या एयरफोर्स वनच्या पर्यायाच्या रुपात या नव्या विमानाचा वापर होणार आहे. कतार देत असलेलं प्लेन हे सध्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या विमानापेक्षा अधिक शानदार असणार आहे.
महागड्या गिफ्टवरुन वाद
ट्रम्प यांना मिळणाऱ्या या लक्झरी गिफ्टवरुन वादही सुरु झाला आहे. अमेरिकेच्या संसदेच्या परवानगीशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अशी भेट घेऊ शकत नाहीत, असं अमेरिकेच्या घटनेत नमूद करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. डेमोक्रेटिक खासदारांनी याबाबत विरोध दर्शवला आहे. ट्रम्प यांच्या व्यवहारांच्या हितासाठी हे विमान देण्यात येत असल्याची टीका करण्यात येतेय. थोडक्यात या महागड्या गिफ्ट वरुन ट्रम्प यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होताना दिसतोय.