Eknath Shinde : आज राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल आज लागला. राज्यात एकूण ९४.१० टक्के निकाल लागला आहे. तर राज्यात कोकण विभाग सर्वाधिक आघाडीवर म्हणजे ९८ टक्के निकाल लागला आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षेत मुलींच्या यशाची वाढती टक्केवारी ही समाजातील सकारात्मक बदलाचं प्रतीक आहे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तीर्ण मुलींचे कौतुक करत अभिनंदन केले.
परीक्षा म्हणजे आयुष्याची अंतिम कसोटी नाही
दरम्यान, दहावी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर यश मिळवणं ही केवळ परीक्षेतील कामगिरी नसून त्यामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन असते. या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना निराश होण्याचे कारण नाही. परीक्षा ही आयुष्याची अंतिम कसोटी नसते. अपयश ही यशाच्या दिशेने टाकलेली एक पायरी आहे.

अपयशाने निराश होऊ नका
यश नेहमीच तयारीची वाट पाहत असतं. तुमच्यावर विश्वास ठेवा आणि पुन्हा प्रयत्न करा…, आत्मपरीक्षण करा, चुका शोधा आणि नव्या उत्साहाने पुढे या. अपयशाने निराश होऊ नका, असेही उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले आहे. तर दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.