How To Book A Whole Train : तुम्ही अनेकदा पूर्ण बस बुक केली असेल, पण कधी अख्खीच्या अख्खी ट्रेन बुक केली आहे का? एखाद्या लग्नासाठी किंवा तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी कधीकधी ट्रेनचा एक कोच बुक केला असेल, पण कधी संपूर्ण ट्रेन बुक केली आहे का? विशेष म्हणजे, फारच कमी लोकांना माहिती असते, की ट्रेनचा कोच किंवा संपूर्ण ट्रेन कशी बुक करावी.
होय, रेल्वेच्या एका खास सुविधेंतर्गत आणि आपल्या गरजेनुसार आणि सोयीनुसार ट्रेनचा संपूर्ण डबा किंवा संपूर्ण ट्रेन आरक्षित करू शकता. ही सुविधा त्या प्रवाशांसाठी वरदान ठरते आहे, जे गर्दीपासून दूर, आपल्या माणसांसोबत एक आरामदायक आणि खासगी प्रवासाचा अनुभव देते.

चला तर मग, जाणून घेऊया की तुम्ही घरबसल्या संपूर्ण ट्रेन किंवा एक कोच कसा बुक करू शकता.
संपूर्ण ट्रेन कशी बुक करायची?
ट्रेनमधील एखादा कोच किंवा संपूर्ण ट्रेन बुक करण्याची प्रक्रिया IRCTC वर तशी नसते, जशी सामान्य तिकीट बुक करताना असते. यासाठी रेल्वेने IRCTC च्या वेबसाइटवर एक खास विभाग तयार केला आहे. ट्रेनचा कोच किंवा संपूर्ण ट्रेन बुक करण्यासाठी तुम्हाला www.ftr.irctc.co.in या वेबसाइटवर जाऊन “Full Tariff Rate” अंतर्गत बुकिंग करावी लागते. ही सुविधा मोठ्या संख्येने बुकिंगसाठी IRCTC कडून देण्यात आली आहे. येथे जाऊन तुम्ही संपूर्ण ट्रेन किंवा फक्त एक किंवा अधिक कोच बुक करू शकता.
बुकिंग करताना तुम्हाला काही आवश्यक माहिती आधीपासून तयार ठेवावी लागते. या माहितीमध्ये तुम्हाला सांगावे लागेल की प्रवास कुठून कुठपर्यंत करायचा आहे, किती आणि कोणते कोच हवेत, जसे की स्लीपर, एसी इत्यादी, किती दिवसांच्या टूरसाठी तुम्ही बुकिंग करत आहात आणि एकूण किती प्रवाशांसाठी बुकिंग करायचे आहे. या सर्व माहितीच्या आधारे तुम्हाला एक अंदाजे भाडे दाखवले जाईल. बुकिंग करण्यापूर्वी ही सगळी माहिती तयार ठेवावी लागेल, जेणेकरून तुमची बुकिंग प्रक्रिया लवकर पूर्ण होईल.
संपूर्ण रक्कम एकाचवेळी भरावी लागेल
संपूर्ण ट्रेन किंवा कोच बुक करताना, तुम्हाला नमूद केलेली संपूर्ण रक्कम आगाऊ भरावी लागते. म्हणजेच, एकूण भाड्यापैकी १००% रक्कम एकाच वेळी भरावी लागेल. यासोबतच, तुम्हाला एक सुरक्षा ठेव (Security Deposit) देखील भरावी लागते. ही सुरक्षा ठेव तुमचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर, रेल्वेच्या नियमांनुसार तपासणी करून, तुम्हाला परत केली जाते.
यासोबतच, सर्व प्रवाशांची यादी आणि त्यांच्या ओळखीच्या कागदपत्रांची माहिती रेल्वेला द्यावी लागते. ही प्रक्रिया बुकिंग करण्याच्या अगोदरच पूर्ण करून ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे काम जलद गतीने पूर्ण होऊ शकेल. या सुविधेचा वापर करून तुम्ही गर्दीपासून दूर राहत, आरामदायक पद्धतीने तुमच्या संपूर्ण ग्रुपसोबत प्रवासाचा आनंद घेऊ शकता.