मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत आज एक मोठे अपडेट समोर आले आहे. रेल्वे मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, महाराष्ट्रातील घनसोली आणि शिलफाटा यांच्यामधील समुद्राखालील 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या टप्प्याची लांबी 2.7 किलोमीटर आहे. मंत्रालयाने असेही सांगितले की, जपान सरकारने 508 किलोमीटर लांबीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात E10 शिंकानसेन गाड्यांचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे.
मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, “बुलेट ट्रेन प्रकल्पाने एक मोठी उपलब्धी मिळवली आहे. बीकेसी आणि ठाणे यांच्यामधील समुद्राखालील 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाअंतर्गत अलीकडेच 310 किलोमीटर ‘वायाडक्ट’ (उड्डाणपूल) चे काम पूर्ण झाले आहे.”

भारत-जपानमध्ये एकाच वेळी सुरू होतील E10 गाड्या
निवेदनात पुढे म्हटले आहे, “रेल्वे पट्ट्या टाकणे, ओव्हरहेड इलेक्ट्रिकल वायरिंग, स्थानके आणि पूल यांचे काम वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रामध्येही कामाने गती पकडली आहे. यासोबतच ऑपरेशन आणि कंट्रोल सिस्टमची खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.”
सरकारी माहितीनुसार, सध्या चालू असलेली बुलेट ट्रेन ही जपानी शिंकानसेन E5 सिरीजवर आधारित आहे आणि E10 ही त्याची पुढील पिढी असेल. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, “भारत आणि जपानमधील धोरणात्मक भागीदारीअंतर्गत जपान सरकारने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात E10 शिंकानसेन ट्रेनचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे. या E10 गाड्या भारत आणि जपानमध्ये एकाच वेळी सुरू होतील.”
बीकेसी स्टेशन जमिनीखाली 32.5 मीटर खोल असणार
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 508 किलोमीटर लांबीचा संपूर्ण कॉरिडॉर जपानी शिंकानसेन तंत्रज्ञानावर विकसित केला जात आहे. मंत्रालयाने सांगितले की, प्रकल्पांतर्गत नदीवर बनवले जाणारे 15 पूल पूर्ण झाले आहेत, तर आणखी चार पूल अंतिम टप्प्यात आहेत. एकूण 12 स्थानकांपैकी 5 ची कामे पूर्ण झाली असून 3 स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
मंत्रालयाने म्हटले, “बीकेसी स्टेशन ही एक अभियांत्रिकी किमया असेल. हे स्टेशन जमिनीपासून 32.5 मीटर खोल असेल आणि त्याची पायाभरणी अशी केली आहे की त्याच्या वर 95 मीटर उंच इमारत बांधता येईल.”