अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाचं बोइंग ७८७ ड्रिमलाइनर विमान कोसळलं. यामधील सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. न्यूज एजन्सी एपीने गुजरात पोलीस आयुक्तांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे.
एअर इंडियाचं विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने जात होतं. यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटीश, ७ पोर्तुगीज आणि एक कॅनडाई नागरिगांसह एकूण २३० प्रवासी होते. इतर १२ क्रू मेंबर्स होते.

विजय रुपाणी यांचं निधन..
या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी याचं निधन झालं आहे. भाजपचे राज्यसभा खासदार परिमल नाथवानी यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. मात्र काही वेळानंतर त्यांनी ही पोस्ट डिलिट केली. केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रवास करीत होते. ते आपल्या लेकीच्या घरी इंग्लंडला जात होते. विजय रुपाणी यांची पत्नी अंजली रुपाणी गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये आहे. आता विजय रुपाणीदेखील लेकीला भेटायला जात होते.
दुसरीकडे विमान दुर्घटनेबाबत माहिती मिळताच विजय रुपाणी यांच्या घराजवळील परिसरात शोक पसरला आहे. शेजारच्यांनी त्यांच्या घराजवळील मंदिरात पूजा-अर्चा सुरू केली आहे आणि या दुर्घटनेतून ते बचावले जावेत यासाठी प्रार्थना केली जात आहे. अद्याप रुपाणी यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती आलेली नाही.
हे विमान ज्या इमारतीला धडकलं, तेथे अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातावेळी इमारतीत ५० ते ६० डॉक्टर उपस्थित होते. यामध्ये १५ हून अधिक डॉक्टर जखमी झाले आहेत. दुर्घटना घडली तेव्हा अधिकतर मेसमध्ये जेवण करीत होते. ही दुर्घटना इतकी भयंकर होती की इमारतीतील डॉक्टरांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले.
अपघातस्थळावरुन मिळालेले मृतदेह पूर्णपणे जळून गेल्या आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण आहे. अशावेळी डीएनएच्या चाचणीनंतर यांची ओळख पटू शकेल.
डीएनए नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू…
अहमदाबाद सिव्हिल रुग्णालय प्रशासनाने विमान अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.