नवी दिल्ली- सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आपत्कालीन स्थितीत प्रोव्हिडंट फंडाच्या खात्यातून 72 तासांत 5 लाख रुपये आता काढता येणार आहेत. यापूर्वी ही मर्यादा केवळ 1 लाख इतकीच होती. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे.
यापूर्वी कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी 28 मार्च रोजी श्रीनगरमध्ये झालेल्या ईपीएफओच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिली होती.

ऑनलाईन काढता येणार पैसे, अधिकाऱ्यांची गरज नाही
विशेष म्हणजे हे पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पीएफ कार्यालयाची पायरी चढावी लागणार नाही. ऑटो सेटलमेंटमध्ये पीएफच्या वि़ड्रॉल क्लेम सिस्टिमद्वारा हे कार्यान्वित होणार आहे. त्यामुळं या प्रक्रियेत अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप असणार नाही.
जर तुमचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर आधार, पॅन आणि बँक खात्याशी लिंक असेल आणि केवायसी अपडेटेड असेल तर सिस्टिम तुमच्या क्लेमची दखल घेऊन प्रक्रिया पूर्ण करेल
ही प्रक्रिया ऑनलाईन असून गतिमान असणार आहे. ऑटो सेटलमेंट क्लेम 3 ते 4 दिवसांत प्रोसेस होणार आहे.
वैद्यकीय उपचारांची गरज, शिक्षण, लग्न किंना घरखरेदीसारख्या कारणांसाठी हे पैसे तातडीनं काढण्याची मुभा देण्यात आली आहे.
यापूर्वी या प्रक्रियेसाठी 15 ते 30 दिवसांचा कालावधी लागत होता. लेखी अर्ज करुन आणि अधिकाऱ्यांच्या पडताळणीनंतर हे पैसे कर्मचाऱ्यांना मिळत होते.
लवकरच पीएफ एटीएममधूनही काढता येणार
ईपीएफओ 3 च्या मसुद्यानुसार येत्या काळात कर्मचारी त्यांचे पीएफचे पैसे एटीएममधून काढू शकणार आहेत. यासाठी पीएफ खातेधारकांना एटीएम कार्डाप्रमाणे पीएफ विड्रॉल कार्ड दिले जाणार असल्याची माहिती आहे. या नव्या सुविधेत कर्चारी दर महिना एक ठरावीक रक्कम काढू शकणार आहेत. तर यूपीआयद्वारे हे पैसे काढायचे असल्यास पीएफ अकाऊंट यूपीआयशी लिंक करावे लागणार आहे. हे केल्यानंतर पीएफचे पैसे थेट कर्मचाऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतील.
नोकरी सोडल्यानंतर एका महिन्यानंतर 75 टक्के पीएफ काढता येणार
जर एखाद्या कर्मचाऱ्यानं नोकरी सोडली तर कर्मचारी त्याची पीएफच्या रक्कमेतील 75 टक्के वाटा हा एका महिन्याच्या नंतर काढू शकेल. दुसरी नोकरी हातात मिळेपर्यंत हे पैसे त्याच्या उपजीवीकेच्या कामी येतील. तर उर्वरित 25 टक्के रक्कम दोन महिन्यांनंतर काढता येईल.