EPFO च्या सदस्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. आता जर तुम्हाला पीएफ फंडमधून अॅडव्हान्स रक्कम काढायची असेल, तर जास्त वेळ थांबण्याची गरज नाही. केंद्र सरकारने ऑटो सेटलमेंटची मर्यादा 1 लाख रुपयांवरून थेट 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. ही माहिती 24 जून 2025 रोजी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.
कोरोना काळात सुरू झाली होती ही सुविधा
EPFO ने प्रथमच कोविड-19 महामारीच्या काळात अॅडव्हान्स क्लेमसाठी ऑटो सेटलमेंट प्रणाली सुरू केली होती, जेणेकरून लोकांना त्यांच्या फंडपर्यंत लवकरात लवकर पोहोचता यावे. याआधी ही मर्यादा 1 लाख रुपये होती, परंतु आता ती 5 लाख रुपये करण्यात आली आहे. याचा फायदा विशेषतः अशा लोकांना होणार आहे ज्यांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पैशांची गरज असते.

सोशल मीडियावर मिळाली उत्स्फूर्त दाद
ही बातमी समोर येताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचा ट्विटर) वर लोकांनी EPFO चे भरभरून कौतुक केले. एका युजरने लिहिले, “EPFO चे शानदार पाऊल! 5 लाख रुपयांपर्यंतचे ऑटो सेटलमेंट ही केवळ सुविधा नाही, तर गरजूंना दिलेला सन्मान आहे.”
18-25 वयोगटातील तरुण सर्वाधिक सक्रिय
EPFO च्या एप्रिल 2025 मधील आकडेवारीनुसार, या महिन्यात एकूण 19.14 लाख नवीन सदस्य जोडले गेले. मार्च 2025 च्या तुलनेत ही वाढ 31.31 टक्के आहे, तर एप्रिल 2024 च्या तुलनेत 1.17 टक्क्यांनी जास्त आहे. यामध्ये 18 ते 25 वयोगटातील तरुणांची मोठी भागीदारी होती. या वयोगटातील एकूण 4.89 लाख सदस्य नोंदवले गेले, जे एकूण नव्या सदस्यांपैकी 57.67 टक्के आहेत.
महाराष्ट्र आघाडीचे राज्य
राज्यानुसार पाहता, महाराष्ट्राने सर्वाधिक नवीन PF सदस्य जोडण्यात इतर राज्यांना मागे टाकले आहे. याशिवाय, 15.77 लाख लोकांनी एप्रिल 2025 मध्ये EPFO मध्ये पुन्हा प्रवेश केला, जे मागे काही कारणास्तव बाहेर पडले होते. हे रोजगाराच्या संधी वाढल्याचं आणि लोकांमध्ये PF विषयी जागरुकता वाढल्याचं मोठं लक्षण आहे.
प्रक्रिया काय आहे?
EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा.
‘Online Services’ विभागात जा आणि ‘Claim (Form-31, 19, 10C & 10D)’ निवडा.
UAN, बँक तपशील आणि आधार तपासल्यानंतर फॉर्म भरा.
‘Purpose’ मध्ये Advance (Form 31) निवडा आणि रक्कम भरा.
‘I agree’ वर क्लिक करून सबमिट करा.
1-3 दिवसात पैसे खात्यावर जमा होतील, जर ऑटो सटलमेंटसाठी पात्र असाल.
या निर्णयाचा फायदा
आपत्कालीन वैद्यकीय खर्च, लग्न, शिक्षण किंवा घर खरेदीसारख्या कारणांसाठी लगेच निधी मिळणे शक्य होईल. ही सुविधा EPFO सदस्यांसाठी मोठा दिलासा आहे.