मुंबई- सतत महागाईच्या चटक्यांनी हैराण झालेल्या नागरिकांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. गेल्या सहा महिन्यांत महागाई दर सातत्यानं उतरता असून, एप्रिलमध्ये हा दर ३.१६ टक्क्यांवर जाऊन पोहचलाय. मार्च महिन्यात हाच दर 3.34 टक्के होता. महिनाभरात महागाईत 0.18 टक्क्यांनी घट झालेली आहे. जाणकरांच्या मते महागाई दर ३.२७ टक्क्यांवर येणं अपेक्षित होतं. मात्र त्याहीपेक्षा कमी दर यावेळी गाठलाय.
खाद्य महागाई दरातही चांगली घट
देशातील महागाई दरातील खाद्य महागाई दरात मोठी घट पाहायला मिळालीय. एप्रिल महिन्यात हा दर २.६९ टक्क्यांवरुन १,७८ टक्क्यांवर पोहोचलाय. महागाई दराचं अनुमान करणाऱ्या संस्थांनी खाद्य महागाई दर नियंत्रणात राहील असं भाकित वर्तवलं होतं. सोनं महाग झाल्यानं मुख्य महागाई दरात वाढ होण्याची शक्यता होती. बाजारातील परिस्थिती आणि जागतिक ताण-तणावाच्या स्थितीत सोन्याच्या किमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळाल्या. भारतात सोनं एक लाख प्रतितोळ्याच्या किमतीवर जाऊन परत आलं.

रेपो रेट सहा टक्क्यांवर
सातत्यानं कमी होणारा महागाईचा दर आरबीआय आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आगामी काळात दिलासादायक भूमिका घेण्याचे संकेत दिलेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. नुकतेच आरबीआयनं रेपो रेट कमी करुन ६ टक्क्यांवर आणले आहेत.
जीडीपीत वाढ होण्याचे संकेत
देशाच्या त्रैमासिक जीडीपीचे आकडे ३० मेला येतील. बँक ऑफ अमेरिकेच्या अंदाजानुसार भारताचा जीडीपी दर ६.७ टक्के असेल. डिसेंबरच्या ६.२ टक्क्यांच्या तुलनेत जीडीपी वाढण्याची शक्यता आहे. मात्र वर्षाखेरीस जीडीपी दर ६.५ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. महागाई दरात झालेल्या कपातीमुळे आगामी काळात व्याजदर आणखी खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. आगामी वर्षात मोठी व्याज कपात झाल्यास बाजारात अर्थव्यवस्थेला गती देणारे व्यवहार होण्याचे संकेत आहेत.