मुंबई- शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बदल अखेरीस घडला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबतचा संभ्रमही यानिमित्तानं संपलाय.
अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार राष्ट्रवादीपुढे अनेक आव्हानं आहेत. अनेक नेते सत्ताधारी अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. अशा स्थितीत पक्ष एकसंध ठेवण्याचं आव्हान शशिकांत शिंदे यांच्यासमोर असणार आहे.

शशिकांत शिंदेंना मोठी संधी
सातारा जिल्ह्यातील असलेल्या शशिकांत शिंदे यांना यानिमित्तानं मोठी संधी मिळाली आहे. माथाडी कामगारांचे नेते अशी त्यांची ओळख आहे. पक्ष स्थापनेपासून त्यांनी शरद पवार यांना मोठी साथ दिलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावशाली नेतृत्व आणि मुंबई, नवी मुंबईत त्यांचा दबदबा आहे. संघटनात्मक कामाचा अनुभवही त्यांच्या पाठिशी आहे.
शशिकांत शिंदे हे साताऱ्यातील जावळी तालुक्यातील हुमगावचे आहेत. कामर्सच शाखेचे पदवीधर असलेले शशिकांत शिंदे 1999 साली पहिल्यांदा जावळी विधानसभा मतदारसंघआतून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदा मंत्री म्हणून कार्यभारही सांभाळलेला आहे. 2009 साली कोरेगाव मतदारसंघातून शालिनीताई पाटील यांचा पराभवही त्यांनी केला होता. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता. सध्या ते विधान परिषदेवर असून पक्षाचे मुख्य प्रतोदही आहेत.
आर आर पाटील यांच्याप्रमाणे संधीचे सोने करणार-शिंदे
पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर देणार असल्याचं शशिकांत शिंदे यांनी पदभार स्वाकीरल्यानंतर सांगितलंय. राज्यभर सक्रियपणे काम करणार असून आर आर पाटील यांच्याप्रमाणे या संधीचं सोनं करणार असल्याचंही शिंदे म्हणालेत. वेळ पडल्यास सरकारशी रस्त्यावर उतरुन संघर्ष करु असंही शिंदे पुढे म्हणालेत.
हीच योग्य वेळ, काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील हे गेल्या काही काळापासून भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पक्षात मनमानी पद्धतीनं नियुक्त्या केल्यानं तरुण नेतृत्व नाराज असल्याचीही चर्चा गेल्या काही काळात होती. जयंत पाटील यांच्याकडे सात वर्ष प्रदेशाध्यक्षपदाची धुरा होती. त्यांच्याऐवजी नव्या तरुण रक्ताकडे ही संधी देण्याची मागणी करण्यात येत होती. रोहित पवार हेही याच विचारांचे असल्याची चर्चा होती. अखेरीस जयंत पाटील पायउतार झाले आहेत. यावेळी बोलताना शरद पवारांनी आपल्याला सात वर्ष संधी दिली याबाबत त्यांनी आभार मानले आहेत. राष्ट्रवादीपासून लांब जाणार नाही, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.