‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये दामाद जी म्हणून ओळख मिळवलेला अभिनेता आसिफ खान याला नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या २ दिवसांपासून तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे, याची माहिती स्वतः आसिफने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केली आहे.
जीवनाची खरी किंमत समजली- आसिफ खान
आसिफने आपल्या पहिल्या स्टोरीमध्ये लिहिले:”गेल्या ३६ तासांपासून जे पाहिलं, त्यानंतर जाणवलं की आयुष्य किती लहान आहे. कोणताही दिवस हलकंफुलकं घेऊ नका. प्रत्येक क्षणात काहीही बदलू शकतं. तुमच्याकडे जे काही आहे आणि जसे आहात, त्यासाठी कृतज्ञ रहा. कोण तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा आणि त्यांना जपून ठेवा. आयुष्य हे एक गिफ्ट आहे आणि आपण नशिबवान आहोत.”

आता तब्येत कशी आहे?
दुसऱ्या स्टोरीत आसिफने स्वास्थ्यविषयी अपडेट दिलं. “गेल्या काही तासांत तब्येत खराब झाली होती आणि रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. पण आता हे सांगताना आनंद होतोय की मी बरा होतोय आणि पूर्वीपेक्षा खूप चांगलं वाटतंय. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी, काळजीसाठी आणि शुभेच्छांसाठी मनापासून आभार. तुमचं साथ माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी लवकरच परत येईन. तोपर्यंत माझ्या आठवणीत राहा आणि मला तुमच्या प्रार्थनांमध्ये ठेवा.”
‘पंचायत’ मधील “दामाद जी” म्हणून लोकप्रियता
आसिफ खानला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती प्राइम व्हिडीओवरील वेब सीरिज ‘पंचायत’ मधून, जिथे त्यांनी ‘दामाद जी’ हे पात्र साकारलं. तो जयदीप अहलावत यांच्यासोबतच्या ‘पाताल लोक’ या गाजलेल्या सीरिजमध्येही झळकला होता.
तसेच तो ‘काकुड़ा’ आणि ‘द भूतनी’ या चित्रपटांमध्येही दिसले आहेत. आता चाहत्यांना केवळ आसिफच्या लवकरात लवकर पूर्ण बरे होण्याची आणि पुन्हा अभिनयात दमदार पुनरागमन करण्याची अपेक्षा आहे.