मुंबई: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा अखेर चौकशीच्या फेऱ्यात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचं प्रकरण बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होतं, त्यानंतर आता मुंबई पोलीस थेट चेन्नईमध्ये जात कुणाल कामराची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. याआधी कुणालला पोलिसांनी समन्स बजावले होते.
पोलिसांना अखेर चौकशीची परवानगी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणं सादर केल्याच हे प्रकरण आहे. अखेर कॉमेडियन कुणाल कामराची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. कुणालची चेन्नईमध्ये चौकशी करण्यास मुंबई पोलिसांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस चेन्नईला जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुणाल कामराचा जबाब नोंदवणार आहेत. आता या चौकशीतून नेमक्या काय बाबी समोर येतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या प्रकरणात पोलीस कामराला प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात उपस्थित राहून जबाब नोंदविण्यास समन्स पाठवत आहेत. परंतु कामरा पहिल्या दिवसापासून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्यास तयार आहे, असा युक्तीवाद त्याच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान केला होता. त्यानंतर चेन्नईला जाऊन त्याची चौकशी करण्याची परवागनी मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे.
कोण आहे कुणाल कामरा?
कुणाल कामराचा जन्म 3 ऑक्टोबर 1988 रोजी झाला आणि तो व्यवसायाने एक स्टँडअप कॉमेडियन आहे. राजकीय विषयांवर त्याने केलेली स्टँडअप कॉमेडी अनेकदा चर्चेत आली आहे. कुणालने वाणिज्य शाखेत पदवी मिळविण्यासाठी जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, पण त्याने दुसऱ्या वर्षातच महाविद्यालयाला राम राम केला. त्यानंतर तो प्रसून पांडेंची जाहिरात चित्रपट निर्मिती संस्था ‘कॉर्कोइस फिल्म्स’मध्ये निर्मिती सहाय्यक म्हणून काम करू लागला. त्याठिकाणी तो ११ वर्षे कार्यरत होता.
2013 मध्ये मुंबईतील कॅनव्हास लाफ क्लबमध्ये एका कार्यक्रमाद्वारे त्याने स्टँडअप कॉमेडियन म्हणून सुरुवात केली. 2016 साली त्याच्या एका शोची क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामुळे त्याला जीवे मारण्याची धमकीही मिळाली. यानंतर खऱ्या अर्थाने कुणाल कामराच्या करिअरची सुरूवात झाली होती.