राज्याला अवकाळीचा इशारा कायम; पश्चिम महाराष्ट्रात मोठं नुकसान!

महाराष्ट्राला पुढील 3 दिवस पावसाचा इशारा कायम आहे. हवामान विभागाकडून ठिकठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात 20 मे रोजी देखील राज्यभरात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. राज्यात पुढील 3  दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात ढगाळ वातावरण राहील. असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यावर पावसाचे ढग कायम आहेत.

कुठे अन् किती बरसणार?

मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहील. पुढील 3 दिवस मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात 20 मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा, धाराशिव, सांगली, सोलापूर, लातूर, सिंधुदुर्ग आणि पुण्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. इथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागांत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूरमध्ये वेगाने वारे वाहतील. तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकंदरीत अवघ्या महाराष्ट्रात कमी अधिक फरकाने पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात मोठं नुकसान

यंदा अवकाळी – पूर्वमोसमी पावसाने पश्चिम महाराष्ट्रात शेती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत बागायती क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्यात केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. तर तिकडे सांगली आणि सातारा जिल्ह्यात द्राक्षं बागांचं मोठंं नुकसान झालं आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम भागातील आंबा बागायतदारांचं न भरून येणारं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्या बळीराजा मेटाकुटीला आल्याचे चित्र सध्या या भागात आहे. शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनामे करून, सरकारी मदत द्या अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आता शासकीय पातळीवर याला कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News