राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सहकारी छगन भुजबळ आज राजभवनात शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाला असून भुजबळांना धनंजय मुंडे यांचेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय दिलं जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. थोड्या वेळात हा शपथविधी पार पडेल, मात्र त्याआधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी या निर्णयावर टीका केली आहे, नेमकं अंजली दमानियांनी म्हटलंय, ते सविस्तर जाणून घेऊ…
अंजली दमानिया काय म्हटल्या?
भुजबळांना मंत्रिपद मिळणार ही बातमी समजताच अंजली दमानियांनी संताप व्यक्त केला आहे. ‘ एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ? असा काय नाईलाज आहे ? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात ? “भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार 400 पार” “भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम” हा आहे का तो बडा कदम ? ही ती कारवाई ?’ तुम्हाला राजकारणात सभ्य माणसं मिळत नाहीत का? असा सवाल दमानियांनी उपस्थित केला आहे.

छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार ?
वाह फडणवीस वाह !
म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ?
असा… pic.twitter.com/dLj7MN79JE
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 20, 2025
राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याने झालेला गदारोळ अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ मंगळवारी 20 मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. माहितीनुसार, मंगळवारी मुंबईतील राजभवनात सकाळी 9 अथवा 10 वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे.
भुजबळांना संधी देण्याचे कारण?
छगन भुजबळ यांची ओबीसी नेते अशी ओळख आहे. राज्यातील ओबीसी मतदारांवर छगन भुजबळांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या या छबीचा महायुती सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो. ओबीसी मतांंसाठी असा निर्णय घेतला असावा अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या वादळात देखील महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत छगन भुजबळ येवला मतदारसंघातून उभे होते. यावेळी त्याने 1 लाख 34 हजार 154 मतं पडली होती. त्यांनी शरद पवार गटाच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला होता. माणिकराव शिंदे यांना 1 लाख 8 हजार 2 मतं पडली होती. त्यामुळे भुजबळांचा महत्व नाकारता येत नाही.