Thane Coronavirus Death : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे अशा शहरांमध्ये रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे २१ वर्षांच्या तरुणाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्व नागरिकांना सतर्क राहण्याची आणि काळजी घेण्याची विनंती करण्यात येत आहे.
ठाण्यातील २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण ठाण्यातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेला पहिला रुग्ण आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू होते. पण आज सकाळी उपचारादरम्यान त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हा तरुण मुंब्रा येथील रहिवासी होता. आज सकाळी ६.०० वाजताच्या सुमारास त्याचे दुर्दैवी निधन झाले.

२२ मे रोजी या रुग्णाला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याची कोरोना चाचणी करण्यात आली आणि काल त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मुंबईतील कोरोनाची सध्याची परिस्थिती काय?
सध्या मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. २३ मे रोजी राज्यात ४५ नवीन रुग्ण आढळले, त्यापैकी एकट्या मुंबईत ३५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या १८५ वर पोहोचली आहे आणि आजही या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
मे महिन्यापासूनच मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC) कडून नागरिकांना सतर्क राहण्याचे व आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांमध्येही कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच, कोणालाही कोरोना लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून वेळेवर उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संसर्गापासून बचावासाठी प्रशासनाने सर्व नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.