डोंबिवली : गेल्या मंगळवारी जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २७ पर्यटक मृत्युमुखी पडले होते. तर महाराष्टातील सहा पर्यटकांना जीव गमवावा लागला. यात डोबिंवलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तीन लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांची रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते.
सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन…
दरम्यान, भेटीवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्याकडून घडलेला प्रसंग जाणून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले. या हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्यांच्या कुटूंबाना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगताना या पीडित कुटूंबातील मुलांचे शिक्षण त्यांची नोकरी यासाठी देखील शासन सर्वतोपरी मदत करेल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

हदशतवाद्यांना सोडणार नाही…
दुसरीकडे मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांत्वनपर भेट घेतल्यानंतर त्यांना आश्वस्त करताना त्यांना धीर दिला. तसेच या घटनेतील दोषींवर केंद्र सरकार कठोरात कठोर कारवाई करून तुम्हाला नक्की न्याय मिळवून देईल असेही सांगितले. निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या हदशतवाद्यांना आमचे केंद्र सरकार सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले. यावेळी कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक महेश पाटील आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.